मतदारांची तीन श्रेणींत वर्गीकरण करुन लखोटे वाटले जात असल्याचा केला आरोप.
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे तथा शिवसेना ( उबाठा ) माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी भाजपावर विविध आरोप करत भाजपाची प्रचाराची पातळी खालावली असल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाच्या निश्चितीमुळे विरोधी पक्षाच्या उमेदवार, नेते व कार्यकर्ते यांच्या प्रचाराची पातळी घसरली आहे असे सांगताना मंदार केणी म्हणाले आहेत की प्रचाराच्या जाहीरनाम्यातील विकासाचे मुद्दे, विरोधी मुद्दे आणि आपण ज्या मतदार संघातील जनतेसह काय करणार हे जाहीर नाम्यातून सांगण्यात येते किंवा घरोघरी तसा जाहीरनामा प्रचाराचा प्रमुख भाग म्हणून दिला जातो.परंतु वातावरण आपल्या विरुद्ध असल्याची जाणीव आणि मोदींची जादू संपल्याने आता घरोघरी मतदारांना लखोटे देण्यात येत आहेत असा आरोप मंदार केणी यांनी केला आहे.
भाजपाने आता जनतेची ए, बी , सी असे वर्गीकरण केले आहे.ए म्हणजे विकले जाणारे मतदार, बी म्हणजे विकले गेलेले मतदार आणि सी म्हणजे सर्वसामान्य मतदार असे वर्गीकरण करुन याद्या बनविल्या गेल्या असून त्याप्रमाणे लखोटे दिले जात आहेत अशा खालच्या पातळीवर जाऊन मतदार विकत घ्यायचा प्रकार भाजपाकडून होत असल्याचा मंदार केणी यांनी आरोप केला आहे. जनतेने मात्र आपली किंमत पाच वर्षांसाठी किती केली जात आहे तसेच जनतेच्या कष्टाच्या रुपाने येणार्या विकास कामांमून विविध माध्यमातून जनतेची लूट करुन तेच लखोट्यातून जनतेला पाच वर्षांसाठी दिले जात आहेत असे मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
महागाई, वाढलेले सिलिंडरचे भाव, मार्चपासून तब्बल ३५० रुपये वाढलेले लाईट बील, वाढलेले औषधांचे दर, वाढलेली घरपट्टी, वेगवेगळ्या जनता आपल्या दारी कार्यक्रम व मोंदीच्या दौर्यासाठी शासकीय पैशांची लूट, जाहिरातींच्या माध्यमातून पैशांची खैरात आणि लोकशाही संपवण्यासाठी कायद्याच्या संस्थांचा वापर, दडपशाही, हुकुमशाही असे भविष्यातील धोके जनतेने ओळखले आहेत व आत्ता भाजपाने केलेला खर्च जनतेच्याच दैनंदिन जीवनातून वसूल करणार याची जाणीव आता जनतेला झालेली आहे असेही मंदार केणी यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनता देखिल मतदान करताना विचारपूर्वकच मतदान करेल असे मंदार केणी यांनी सांगितले आहे. कोकणातील खासकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही स्वाभिमानी आहे असेही मंदार केणी यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.
येणार्या काळात जनतेला शांतता राखणार्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. सिडको सारख्या प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या किनारपट्टीवरील जागा धनदांडग्यांच्या ताब्यात देण्याचा डाव भाजपा सरकारने आखला आहे. जनतेला धमकी देणारे लोकप्रतिनिधी आर्थिक ताकद वापरून निवडून आणण्याचा घाट घातला जात आहे असे मंदार केणी यांनी सांगत, जनतेने याचे गांभीर्य राखून मतदान करावे असे आवाहन प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.