मालवण : भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे भाजपाचे व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी १९९० सालापासून स्वकर्तुत्वाने व बुद्धिमतेने सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर कोकणचा कायापालट केला असल्याचे सांगितले आहे. दत्ता सामंत यांनी, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत सांगितले की खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे राणेंच्या विरोधात केवळ खोट्या अफवा पसरवण्याचे काम केले होते आणि आजही ते तशीच अपप्रचाराची कामे करत आहेत.
विकासाचा विचार करता पूर्वी नारायण राणे यांनी जे रस्ते सुसज्ज बनवले होते त्यांचे नीटसे नूतनीकरण सुद्धा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्याकडून केले गेले नसल्याचे दत्ता सामंत यांनी नमूद केले. सत्तेत आल्यावर राणेंची प्रकरणे बाहेर काढू व त्यांना जेलमध्ये पाठवू वगैरे वल्गना विनायक राऊत यांनी केली होती परंतु अडिच वर्ष सत्ता संपूर्णतः हातात असून देखील राणेंवरील एकही आरोप राऊत सिद्ध करु शकले नाहीत व केवळ खोटे बोलून स्वार्थ साधत बसलात अशी टीका दत्ता सामंत यांनी केली आहे.
१९९० मध्ये कोकणात आल्यानंतर नारायण राणे यांनी तळागाळातील गरीबाला सुद्धा विविध पदावर बसवले असे सांगत भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून चांगले काम केले व त्यांना लोकसभेचे तिकीट आग्रहपूर्वक देण्यात आल्याचे सांगितले. सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नारायण राणे यांच्या कार्याची जाणीव ठेवून एकत्र येत त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणायचे आवाहन देखील भाजपा प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी केले.