केरळ आणि गोवा राज्यातील धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास न झाल्याची व्यक्त केली खंत..
कणकवली | उमेश परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे कार्यकर्त्यांना धमकावतात पण या जिल्ह्यात गद्दारीचे जनक राणेच आहेत. त्यातूनच त्यांचे कार्यकर्ते उगम पावल्याने याचे श्रेय त्यांनाच जाते. मात्र राणेंची धमकी त्यांच्या समर्थकांना असते की जुन्या भाजपवासियांना? असा सवाल करत भाजपाने राणेंना जवळ करून विषवल्ली पोसली आहे, त्याची फळे आता त्यांना मिळू लागली असल्याची टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री रावराणे म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेबाबत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे खेदजनक म्हणावे लागेल. गेली वीस वर्षे जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच महसूल मंत्री, दुग्धविकास मंत्री, उद्योग मंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करूनही जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काहीच केले नाही, याची पोचपावती त्यांच्याच वक्तव्यातून दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री असताना उद्योगधंदे आणले असते, तर आज चित्र वेगळे असले असते. आजही केंद्रीय उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर बेंगलोर येथील व्यावसायिकाला आणून फॅक्टरी सुरू करण्याचे संकेत श्री. राणे देत आहेत. मात्र जिल्ह्यातील उद्योजकांना, नवीन तरुणांना यात आणण्याचा त्यांचा कोणताही मानस नाही. जिल्ह्यातील तरुणांना सोबत घेतले तर भागीदारी मिळणार नाही म्हणूनच बाहेरच्या व्यवसायिकांना आणण्याचे घाटत असावे, अशी शंकाही श्री. रावराणे यांनी उपस्थित केली आहे. केरळ, गोवा राज्याने जो विकास केला त्या धर्तीवर तुम्ही सिंधुदुर्गमध्ये काहीच का नाही करू शकला? तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोयरबोर्ड, चांदा ते बांदा यासारख्या योजना आणल्या. पण त्याला विरोध करून त्या हाणून पाडण्याचे काम राणे यांनीच केले. मात्र गेल्या दहा वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय जिल्ह्यात पाय रोवत आहेत. बांबूवरील प्रक्रिया उद्योग, काजू प्रक्रियासाठी विविध योजना, काथा व्यवसाय अशा अनेक व्यवसायांसाठी उद्योजकांना साथ देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र गेली दहा वर्षे राजकारणाच्या साईड ट्रॅकवर पडलेल्या नारायण राणे यांना याबाबत बहुदा कल्पना नसावी असे त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसून येते, असेही श्री. रावराणे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाची संस्कृती काय आहे? मात्र भाजपाच्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन राणे कार्यकर्त्यांना धमकी देतात. भाजपने पोसलेली ही विषवल्ली भाजपचा गळा आवळणार हे त्यांच्या आचरणातून सिद्ध होत आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते जनतेला लाठ्याकाठ्याची धमकी देणे म्हणजे यांची काय मानसिकता आहे ते दिसून येते. केंद्रीय उद्योग मंत्रीपदी असलेल्या श्री. राणे यांनी जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांना उद्योग धंद्यात कसं आणता येईल, त्यासाठी अनुदान योजना व काय करता येईल, याबाबत वक्तव्य करून असे काम करण्याची गरज आहे. मात्र ते कार्यकर्ते, जनतेला धमकावत आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला भात आणि मासे खाणार अशी टीका करणाऱ्या श्री. राणे यांनी आजपर्यंत काय खाल्ले? केवळ दिल्लीला गेल्यानंतर डबल रोटी व पराठ्याची एवढी आवड त्यांना लागली का? की आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते जनतेसोबत प्रमुख अन्न असलेल्या भात व मासे हेही त्यांना नावडते वाटू लागले, असा सवालही रावराणे यांनी केला आहे.