मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सावरवाड येथे नव्याने स्थापन झालेल्या शिव मंदिरात आजपासून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या शिव मंदिरात सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली, भोपाळ येथील क्रिया योग साधक तसेच शिव भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सकाळी या शिव मंदिराचे प्रमुख श्री. रुद्रराज यांनी मंदिरातील स्पटिकाच्या शिवलिंगाची पूजाअर्चा करतानाच रुद्राभिषेक आणि गायत्री यज्ञाला प्रारंभ केला. यावेळी धुनी प्रज्वलीत करतानाच १०८ वेळा उपस्थित साधकांनी आणि शिव भक्तांनी रुद्र सुक्ताचे पठण करीत शिव नामाचा जयघोष केला. या जयघोषातच शंखनादासह घंटानाद करीत शिवाची आरतीही पार पडली. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
“हर हर महादेव…. जय भोलेनाथ”, असा जयघोष करताना शंखनाद, घंटानाद करीत आज शेकडो भाविकांनी सावरवाड येथील शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या महामृत्युंजय यज्ञ, रुद्राभिषेक आणि गायत्री यज्ञ प्रज्वलीत करताना शेणाने बनविलेल्या १०८ पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत महाशिवरात्रीच्या उत्सवास शानदार प्रारंभ झाला. या धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे प्रमुख श्री रुद्रराज यांनी केले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उद्या दि ८ मार्च रोजी सकाळपासून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सावरवाडच्या या शिवमंदिरात देशातील ख्यातनाम गायकांचा महाशिवरात्री रागोत्सव हा कार्यक्रम होणार आहे या धार्मिक कार्यक्रमास शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवाचे दर्शन घ्यावे असे आवाहन रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टने केले आहे.
सायंकाळच्या सत्रात उपस्थित शिव साधकांनी पूर्व जन्माचे आणि पूर्वजांचे असणारे कार्मिक दोष तसेच शरीर व्याधी मुक्तीसाठी शेणाने बनविलेल्या १०८ पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले. तर रात्री महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला. यावेळी रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट रोहन लेले, सेक्रेटरी सन्मेष रुद्रस्वर, विश्वस्त नीता नश्विन, ज्योती मेहेरा, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट राजेश पटेल, डॉ. प्रज्ञा पटेल यासह विविध भागातून आलेले शेकडो शिव भक्त उपस्थित होते.
सावरवाड येथील धार्मिक अधिष्ठान असलेल्या या शिव मंदिरात उद्या दिनांक ८ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून धार्मिक विधिना प्रारंभ होणार असून रुद्राभिषेक वेद मंत्र पठण तसेच उपस्थित प्रत्येक शिव भक्ताला स्पटिकाच्या लिंगावर दुग्दभिषेक तसेच पूजन करता येणार आहे. तसेच यावेळी महाप्रसादाचे वाटपही होणार असून देवगडच्या नामांकित ढोल ताशा पथका समवेत शिव पार्वतीच्या धार्मिक सोहळ्याचा आनंद साजरा केला जाणार आहे. यावेळी शंकनाद, डमरू नाद, घंटानाद करतानाच भस्म होळीही खेळली जाणार आहे. तर रात्री आठ वाजता महाशिवरात्री रागोत्सव हा कार्यक्रम सादर केला जाणार असून यामध्ये बनारस घराण्याचे गायक डॉ. आशिष मिश्रा हे सहभागी होणार आहेत त्यांना पंडित श्री. हृषीकेश फडके (तबला), वसीम खान (सारंगी), श्री. प्रसाद गावस (हार्मोनियम) हे साथ देणार आहेत. या कार्यक्रमाचा भाविकांनी तसेच संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टने केले आहे.