विशेष | वैशाली श्रीनिवास पंडित ( उप संपादक) : हे गुरूस्मरण माझ्या शालेय काळातलं म्हणजे १९७१/७२ साला मधलं आहे.
आम्ही तेंव्हा मालाडला गोविंदनगरच्या चाळीत रहात होतो.त्या चाळींमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने साजरे व्हायचे. गणेशोत्सव,नवरात्रोत्सव जोरात असायचे.वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलांना वाव मिळायचा. मी आठवीत होते तेव्हा.नुकतीच कविता लिहायला लागले होते.त्या वाचून दाखवून मी दुस-यांना जेरीसही आणत होते.त्यातच मी शाळेच्या सहलीतून रायगडला जाऊन आले होते..वीरश्रीयुक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरची लांबच्या लांब कविता आल्या आल्या लिहून काढली होती.मराठीच्या बाईंनी तिचं कौतुक केलं होतं. ती कविता मी आमच्या शेजारच्या चाळीतल्या कर्णिककाकांना वाचून दाखवली तेव्हा ते मला म्हणाले , “दोन दिवसांनी आपल्याकडे शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे. बाळ ठाकरे प्रमुख पाहुणे आहेत .तिथे तू ही कविता वाच.”
ठरल्याप्रमाणे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. मुख्य सभेत मला कविता वाचायची होती.त्या नंतर तिथे डी. शांताराम यांचा आॕर्केस्ट्रा होता.त्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. माझे नांव पुकारले गेले, “अब आ रही है, गोविंदनगरकी महान कलाकारा माधुरी परांजपे…परांजपे..परांजपे ..” निवेदकाने माझ्या नावाची फिल्मी घोषणा केली. मी स्टेजवर चढले.समोरची गर्दी बघून टेर की फाय झालेली. स्टेजवर कोण बसलंय वगैरे कशाला बघतेय ? कर्णिककाका तेवढे ओळखीचे वाटले. मी सुरू केलं,” हे शिवराया वंदन पाया… पण लोकांनी जेमतेम दोन ओळी तेवढ्या शांत ऐकून घेतल्या. नंतर जो काय गोंगाट सुरू झाला की माझं मलाच समजत नव्हतं मी काय वाचतेय ! वीररसाची कविता मी भयरस, विनोदरस, करूणरस, अशा रसांच्या काॕकटेलमध्ये पुढे पुढे रेमटवत होते. स्टेजखालून माझ्या भावाने ,” उतर आता .बास झालं .” च्या खाणाखुणा सुरू केल्याने मी पार रडायच्या घाईला आले. आता ‘रणांगण सोडून भागो’ चे संदेश मेंदू देऊ लागला आणि त्याच क्षणाला माझ्या खांद्याला कोणीतरी धरून मला किंचित बाजुला केलं . त्या व्यक्तीने माईकचा ताबा घेतला.” अरेss शिवजयंतीला आलात ना ? लाज नाही वाटत गोंधळ घालायला ? खबरदार , कोणी बोललात तर ! या पोरीची कविता पूर्ण झाल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही.” असा ढाण्या आवाजात दम दिला.त्याच पट्टीत मलाही ‘” तू गं ए ss पोरी ,..छत्रपती शिवाजीमहाराजांवरची कविता लिहिलीस .ती अशी मँ मँ करीत काय वाचतेस ? वाच जोरात.दाखव पाणी मराठी भाषेचं ” असं मलाही खडसावलं. जादू झाल्यासारखी समोरची गर्दी चिडीचूप झाली.खरंतर ती कविता बाळबोधच होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या व्यतिरिक्त तिच्यात काहीच ग्रेट नव्हतं. फारच शाळकरी कविता होती. त्यातनं माझ्यासमोरचा मॉब गुजरथी, हिंदी, मारवाडी, बंगाली वगैरे. ते आॕर्केस्ट्रा ऐकायला जमलेले लोक. तशा अलौकिक परिस्थितीत बाळासाहेबांनी एका पोरवयाच्या मुलीला इतकं प्रोत्साहित करणं म्हणजे विशेषच होतं. खरं सांगते तेव्हा माझी फजिती झाली असती तर मी जन्मात कवितावाचनाला उभी राहिली नसते. मी नवीन उत्साहात पहिल्य़ापासून कविता वाचली. मला स्टेजवरून त्या व्यक्तीकडून सगळ्यात जास्त टाळ्या मिळाल्या. मी कविता संपवून खाली उतरणार त्या आधी मला त्य़ांनी जवळ बोलावलं, मला नांव विचारलं. स्वतःच्या शर्टला लावलेलं पेन मला दिलं. तेंव्हा मला महत्त्व माहीत नसलेली आणखी एक गोष्ट मला दिली. त्यांचं विजिटींग कार्ड. येस. शिवसेना प्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे’ यांचं ते कार्ड होतं… मी नंतर कधीही त्यांना भेटले नाही. पण ते कार्ड कंपासमध्ये जपून ठेवलं होतं. दुस-यांदा ते ठाण्याच्या बेडेकर विद्यामंदिरातल्या आम्हा विद्यार्थ्य्ंसाठी गडकरी रंगायतनला व्यंगचित्रे कशी काढावीत याचे मार्गदर्शन करायला आले होते. दिलेल्या वेळेआधीच ते हजर होते. फटाफट कुंचल्याचे फटकारे मारीत त्यांनी राजकीय व्यक्ति फलकावर रेखाटल्या होत्या. सहज संवाद साधत. कुठेही आपल्या मोठेपणाचा आव नव्हता. शाळकरी वयात आत्मविश्वासाने लेखनाच्या पाऊलवाटेवर मला चालती ठेवण्याचं सगळं श्रेय या ढाण्या वाघाला देते मी.
राजकारणापलिकडचं एक अनाम पालकत्व मला आयुष्यभर प्रेरणा देत राहिलं. माझ्या देव्हा-यात रोज एक फूल त्यांच्या आठवणींना समर्पित असतं…आणि असेल.. ! स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या गुरूस्मृतीला आज २३ जानेवारीला, त्यांच्या जयंती निमित्त विनम्र वंदन.
वैशाली पंडित. ( उप संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल. )