मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आज २८ डिसेंबरला संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, साहित्यिक अजय कांडर, स्कूल कमिटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, नागरी संरक्षण पथक सिंधुदुर्गचे अधिकारी संजय डौर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पालक प्रतिनिधी रिया नेवाळकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी भाग्यश्री लाड, सर्वांगी हाथणकर, प्रकाश कुशे प्रफुल्ल देसाई, आर डी बनसोडे, आर बी देसाई आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना साहित्यिक अजय कांडर म्हणाले की शाळेतुन विद्यार्थ्यावर संस्कार झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा पलीकडे असणा-या गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे. विद्याथ्यामध्ये कोणते गुण आहेत हे त्यांच्या शिक्षकांना निश्चितच माहिती असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी शिक्षक आणि संस्थाचालक प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने भंडारी हायस्कूलचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख आज उंचावलेला दिसत आहे. प्रमाण भाषा महत्वाची की बोली भाषा अशी चर्चा नेहमीच होत असते. शिक्षकांनी शिकवलेली भाषा शिकाल तर पुस्तकी ज्ञान मिळवाल व आईने शिकवलेली भाषा शिकाल तर जगाचे ज्ञान मिळवाल. या दोन्ही भाषेतून मिळणारे ज्ञान महत्वाचे आहे. जर तुम्ही दोन्ही भाषा शिकलात तर तुम्हाला मागे वळून पहावे लागणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संजय डौर यांनी मोबाईल ही माणसासाठी दैनंदिन वापरातील एक महत्वाची वस्तू बनली आहे. मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. परंतु या मोबाईलच्या वापराची दुसरी बाजु देखील पाहणे आवश्यक आहे. मोबाईल व नेटचा वापर करुन होणा-या गुन्हयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, सायबर क्राईम अंतर्गत सेक्सटॉर्शन व आर्थिक फसवणुकी यामध्ये नोंद होणा-या गुन्हयांची संख्या जास्त आहे. १३ ते १९ वयाची ८५ टक्के मुले पॉर्न साईट पाहतात असा एनसीआरबीचा रिपोर्ट आहे. ही बाब पालकांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांचा बारकाईने लक्ष हवा असे ते म्हणाले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भंडारी हायस्कुल माजी विद्यार्थी युवा संघटनेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा स्व. रघुनाथ टेमकर स्मृती आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता नववीमधील विद्यार्थी पार्थ शैलेश मिठबावकर याला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षापासुन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणा-या एका गरीब व होतकरु विद्यार्थ्याची फी माजी विद्यार्थी युवा संघटनेकडुन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्यावतीने जाहिर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल देसाई, सुनंदा वराडकर यांनी केले. तर आभार आर. डी. बनसोडे यांनी मानले.