मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात बुडून एक पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली होती. त्यातील आदित्य पाटील (वय-२१) रा. बस्तवडे, ता. कागल जि. कोल्हापूर असा पर्यटक बेपत्ता झाला होता. दरम्यान आदित्य सोबत समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले होते. समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या आदित्य पाटील या पर्यटकाचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या माध्यमातून शोध सुरू होता. आज शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान शोध कार्य करणाऱ्या स्थानिकांना आदित्य याचा मृतदेह सापडला आहे. याबाबत आदित्य याच्या सहकारी यांना तसेच मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मुरगुडचे येथील एका क्लासचे वीस विद्यार्थी तारकर्ली एमटीडीसी येथे पर्यटनासाठी आले होते. यातील काही जण अंघोळीसाठी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा पाण्यात बुडून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील (वय-२१) रा. कविलगे ता. कागल, जि. कोल्हापूर, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे रा. कविलगे, ता. कागल, जि. कोल्हापूर हेही बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना किनाऱ्यावर आणले होते. तर आदित्य याचा शोध सुरु होता. अखेर शनिवारी दुपारी तारकर्ली येथे शोध पथकास मृतदेह सापडून आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सोबत या शोध मोहिम मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर शिवराज झांझुरे, पो. कॉ. श्री पाटील आदी उपस्थित होते. तारकर्ली येथे सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष शिवगण, पो. कॉ. विश्वास पाटील, पोलीस पाटील भानुदास येरागी, बाबू ढोले, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, कपिल चव्हाण, संकेत तारी, बाबू लोणे यांसह अन्य स्थानिक शोध मोहिमेत सहभागी झाले होते.