बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास अनंत नाडकर्णी (७६ वर्षे) यांचे गुरुवारी सकाळी गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. प्रगतशील बागायतदार, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. देविदास नाडकर्णी हे सामाजिक कार्यात नेहेमीच अग्रेसर असत तसेच शैक्षणिक कार्यातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. पंचक्रोशीतील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता नये यासाठी परिसरातील सहकाऱ्यांच्या मदतीने डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळ स्थापन केले आणि माऊली विद्यामंदिर डोंगरपाल हे माध्यमिक विद्यालय सुरु केले.
शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. अगदी सुरुवातीला विद्यार्थ्यांना पाण्याची गैरसोय होता नये यासाठी त्यांनी स्वतः बैलगाडीतून विद्यालयाला पाणी पुरविले होते. इमारती बांधण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठे योगदान दिले. ते गाळेल गावातील एक प्रगतशील बागायतदार होते. शेतीत ते नेहमी नवनवीन प्रयोग करत असत. विविध क्षेत्रातील अनेकजण त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, दोन मुलगे, विवाहित मुली, सूना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. सावंतवाडी माजी पं. स. सदस्य सुलभा नाडकर्णी यांचे ते पती, शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी, बागायतदार राजीव नाडकर्णी, रेश्मा रोहन केरकर यांचे ते वडील होत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी मुख्याध्यापक प्रेमानंद नाडकर्णी, बागायतदार नारायण नाडकर्णी, प्रवीण नाडकर्णी यांचे ते भाऊ होत. गुरुवारी सायंकाळी उशिरा गाळेल येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.