आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय गणित ऑलिंपियाड मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अध्ययन संस्था मुंबई आणि प्राथमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यात शालेय गणित सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत २०२३ या वर्षात प्रथम सत्रात मापन भाग १ हा घटक घेतला होता. या घटकाची ऑलिंपिक स्पर्धा १६ ऑक्टोबरला बॅ. नाथ पै सेवांगण हॉल, मालवण येथे संपन्न झाली. या ऑलिंपियाड साठी मालवण तालुक्यातील शाळेतील एकूण १२ शाळा सहभागी होत्या. मापन भाग १ या घटकाच्या ऑलिंपिक मध्ये वस्तूची लांबी मोजणे, मापनातील छोट्या राशी व मोठ्या राशी ओळखणे, वस्तू मोजण्यासाठी व्यावहारिक भाषेमध्ये कोणते एकक वापरतात यांच्या जोड्या जुळवणे, वेळेवर आधारित, तापमानावर आधारित शाब्दिक उदाहरणे तसेच प्रत्यक्ष प्रमाण काढणे, असे विविध प्रश्न होते. तसेच, चेंडूचा व्यास काढणे, शंकुची लंबउंची मोजणे, दिलेल्या पट्ट्यांची लांबी व रुंदी मोजणे, दिलेल्या वस्तूंचे वजन मोजणे, असे ऍक्टिव्हिटी राऊंड घेण्यात आले होते. या फेर्यांमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी दर्शवली.
या स्पर्धेसाठी शिक्षक समीर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या ऑलिंपियाड मध्ये मृणाल धुरी , मयूर कुबल, आयुष बाणे ,ताहिद मुजावर , दुर्गेश सारंग, श्रावणी पोटघन , गौरी उदगीरे , स्वरा तळवडकर , लक्ष वाडेकर , पलाश बिनसाळे या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन शाळेला द्वितीय क्रमांक पटकावून दिला म्हणून शाळेच्या शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.