कोजागरती घोष जाहला……!
नभोमंडपी वेळा सजली
शरदचांदणी धरती न्हाली
कोजागरती घोष जाहला
अवनीवरती लक्ष्मी आली।।
नवधान्याचा सुगंध पसरे
कृषिवलांचे आनन हसरे
निर्मितीचा क्षण सौख्याचा
दुःखाला पळभरात विसरे।।
दुग्धप्राशने मिळे स्निग्धता
आरोग्याला येई पुष्टता
कौमुदिचा मृदु शिडकावा
दुधास लाभे शीतलता।।
स्वकीय आप्ता प्रेमे भेटुनी
कोजागरी साजरी करूनी
हेवेदावे मिटवुनी सारे
वाटू आनंद हरसदनी।। (कवयित्री : सौ. संपदा प्रभुदेसाई ,कणकवली )