आमदार वैभव नाईक यांनी केली कुडाळ पंचायत समितीची प्रशंसा.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समिती तर्फे आयोजित ‘श्रावणमेळा’ कार्यक्रम आज कुडाळ येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ पंचायत समिती मार्फत गेली ३ वर्षे श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हा स्तुत्य उपक्रम आहे. त्याअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. शासनाचे सर्वच उपक्रम कुडाळ पंचायत समिती योग्य रीतीने राबवित असल्यामुळे केंद्र व राज्य सरकार कडून पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. कुडाळ पं. स. ने कुडाळ तालुक्याचे नाव ऐका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे असे सांगत आ. वैभव नाईक यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण व त्यांच्या टीमच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, भाजपचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, राजन तेली, कुडाळ पं. स. गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रणजित देसाई यांसह कुडाळ तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.