मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ओझर विद्यामंदिर , कांदळगांव येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन आचरा’ या संस्थेच्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये नुकतेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले. संस्थेच्या संचालिका डॉ. सुचेता नाईक यांनी परिचारिका सुवर्णा देऊलकर व चेतना जाधव यांच्या साथीने ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकते नुसार गोळ्या व औषधांचे मोफत वाटप केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. सुचेता नाईक यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तपासणी करताना वैयक्तिक मार्गदर्शन केले.
हे आरोग्य तपासणी शिबिर ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये आयोजित करण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी विशेष मेहनत घेतली. आरोग्य तपासणी शिबिरासाठी ‘साधना रिसोर्सेस अँड एडवायजरी फाऊंडेशन, आचरा’ संस्थेचे संचालक स्वप्नील तावडे, जिल्हा समन्वयक उमेश सावंत उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कमीतकमी खर्चात उपचार करण्यासाठी संस्थेच्या वतीने भविष्यात हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असल्याचे स्वप्निल तावडे यांनी सांगितले. प्रशालेमध्ये शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डि. डि. जाधव यांनी साधना संस्थेचे आभार मानले. या वेळी शिक्षक ए.ए. शेर्लेकर, पी.के.राणे, एन एस. परुळेकर,पी.आर.पारकर एस.जे. सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर. जे. जाधव, पी. व्ही. खोडके, एम.डी. परुळेकर आणि ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.