बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील
डॉक्टर दुर्भाटकर आणि सावंतवाडी संस्थानचे लखमराजे यांच्या उपस्थितीत नुकताच सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेतून आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या पुढाकारातून आज ‘वन रुपी क्लिनिक’चा दुर्वांकुर बिल्डिंग, जुना शिरोडा नाका, सावंतवाडी येथे शुभारंभ करण्यात आला. एका छोटेखानी शुभारंभ कार्यक्रमात डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर आणि युवराज लखमराजे सावंत – भोसले, डॉ निखिल अवधूत, डॉ कार्लेकर, जयेश सावंत, प्रदीप सावंत, प्रमोद सावंत, संस्थाध्यक्ष दयानंद कुबल आदी मंडळी उपस्थित होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त म्हणजे फक्त एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील तसेच मुंबईतील अनेक डॉक्टर या क्लिनिकमध्ये आरोग्य सेवा पुरवण्याच्या भावनेतून काम करणार आहेत. ज्यामध्ये कान, नाक, घसा, त्वचारोग, डायबिटीस, स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन असे वेगवेगळे डॉक्टर उपस्थित असणार आहेत. आठवड्यातील सातही दिवस हे क्लिनिक उघडे असणार आहे अशी माहिती दयानंद कुबल यांनी दिली.
‘वन रुपी क्लिनिक’ ही सिंधुदुर्गातील खेडोपाड्यातील जनतेच्या आरोग्यम धनसंपदा साठी महत्वपूर्ण ठरेल असे गौरवोद्गार लखमराजे यांनी यावेळी बोलताना काढले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी अवंती गवस, सुरज कुबल, भावना साटम, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, बाळकृष्ण शेळके, समीर शिर्के, सागर कुबल आणि वैशाली कळंगुटकर आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश सावंत, स्वागत देवानंद कुबल यांनी तर आभार अजिंक्य शिंदे यांनी मानले.