मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी ऐवजी एस – १४ वेतनश्रेणी मंजूर झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी मंजूर झाली होती. ही वेतनश्रेणी चुकीची होती. त्यामुळे पदवीधर शिक्षकांचे भविष्यात मोठे आर्थिक नुकसान होणार होते.
या अन्यायकारक वेतनश्रेणीबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने वारंवार निवेदने देवून, भेटी घेवून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच दिनांक ८ मे २०२३, २९ मे २०२३ ला सचिव जिल्हा परिषद आस्थापना ग्रामविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे शिक्षक भारतीच्या वतीने दाद मागण्यात आली होती. पण हा अन्याय दूर होत नसल्याने दिनांक १२ जून २०२३ रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. पण या प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेमार्फत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
या सर्व प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी ऐवजी एस – १४ वेतनश्रेणी मंजूर झाली असून याचा लाभ जिल्ह्यातील ७६ पदवीधर शिक्षकांना मिळणार आहे. याबाबतचे उपसचिव ग्रामविकास विभाग यांचे मंजुरीचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना निर्गमित केले असून त्याची प्रत अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांना प्राप्त झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांवरील अन्याय दूर होवून त्याना एस -१४ वेतनश्रेणी लागू होण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी सकारात्मक पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांची भेट घेवून संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, मालवण तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर, संतोष कोचरेकर, विनेश जाधव, प्रज्योत सावंत, चेतन मागाडे रवी राठोड, सचिन ठाकरे, गणेश आजबे, किरण पवार, जयवंत कुंभार, रवी चव्हाण, गोरख जगधने, महेश व बहुसंख्येने पदवीधर शिक्षक उपस्थित होते. तसेच शिक्षक भारती संघटनेने सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्न करून हा प्रश्न सोडविल्याबद्दल नवनियुक्त पदवीधर शिक्षकांनी ‘शिक्षक भारती संघटनेचे’ विशेष आभार व्यक्त केले आहेत.