‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कवी किशोर कदम यांनी ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ हे निबंधाचे पुस्तक लिहून मुलांच्या वक्तृत्व कलेसाठी एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या लेखमालेचे पुस्तक मुलांचे वक्तृत्व कलेचे भवितव्य घडविणारे आहे. अनेक महामानवांचे दुर्लक्षित पैलू या ग्रंथात कदम यांनी उलघडून दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर मोठ्या माणसानाही या ग्रंथाचा वक्तृत्व कलेसाठी उपयोग होणार आहे असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी येथे केले.
कवी किशोर देऊ कदम यांनी लिहिलेले आणि प्रभा प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन कवी अजय कांडर यांच्या हस्ते कणकवलीत झाले. यावेळी बोलताना कांडर यांनी श्री कदम यांनी ज्या महापुरुषांनी आपला वेगळा इतिहास निर्माण केला तरीही त्यातील काही महापुरुष समाजातून दुर्लक्षित राहिले अशांवर लेखन करून आपली पुरोगामी दृष्टी विस्तारत नेली आहे. अशा लेखनामुळे विद्यार्थ्यांना आपला खरा इतिहास काय आहे हे कळू शकेल आणि त्यातून त्यांची सम्यक दृष्टी घडण्यास या लेखनातून मदतच होईल असेही आग्रहाने सांगितले. ऍड. विलास परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतिहास अभ्यासक प्रा.सोमनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अध्यक्ष संदीप कदम, राजेश कदम, संतोष जाधव, रविकिरण शिरवलकर, दिपक पेडणेकर,नेहा कदम,आर्या कदम, दिप्ती पेडणेकर, तारामती कदम, ओसरगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुप्रिया अपराध आदी उपस्थित होते.
ऍड. विलास परब म्हणाले किशोर कदम हे खऱ्या अर्थाने उपक्रमशील शिक्षक आहेत. याचा अनुभव आम्ही आमच्या ओसरगांव शाळेचे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे घेतला आहे. मुलांचे विविध कला गुण विकसित व्हावेत म्हणून त्यांची सारी धडपड असते. आता त्यांनी ‘वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा’ हे निबंधमालेचे पुस्तक प्रसिद्ध करून मुलांच्या वक्तृत्व कलेला प्रेरणा दिली आहे. हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचायला पाहिजे यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.
प्रा.सोमनाथ कदम म्हणाले, किशोर कदम यांनी लिहिलेल्या ‘वक्तृत्व कलेतील युगनायकांची जीवनगाथा’ या ग्रंथाचे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात अनन्य साधारण असे मोल आहे. १६ महामानवांवर हे लेखन असून अगदी कमी शब्दात खरा इतिहास या पुस्तकामुळे विद्यार्थी दशतच विद्यार्थ्यांना कळणार आहे. अतिशय मेहनतीने आपल्या सम्यक दृष्टीने कदम यांनी हे लेखन केले असल्यामुळे त्यांच्यातील विचारदृष्टीही लक्षात येते. शालेय आणि समाज स्तरावर या ग्रंथाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.
संदीप कदम म्हणाले, किशोर कदम हे गुणी शिक्षक असून त्यांचे हे पुस्तक कास्ट्राईबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळांमध्ये पोचविणार आहोत. तर किशोर कदम म्हणाले, मुलगी आर्या कदम हिला वक्तृत्वस्पलेची आवड असल्यामुळे हे लेखन माझ्याकडून होऊ शकले परंतु या लेखनाचा उपयोग आता विद्यार्थ्यांना होणार असल्याने मला आनंद होत आहे. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनीही शुभेच्छा पाठविल्या होत्या. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार नेहा कदम यांनी मानले.