बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा येथे कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याने बागायतीसह रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले ६ महिने वारंवार पाठपुरावा करुनही ‘बांदा महावितरण २’ च्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. कुडाळच्या अधीक्षक अभियंता यांचे आश्वासनही हवेत विरले आहे. येत्या चार दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकरी शांताराम सावळ यांनी दिला आहे.
मडुरा येथील शेतकरी शांताराम सावळ यांनी सन २०१६ मध्ये कृषीपंपासाठी वीज कनेक्शन घेतले होते. आतापर्यंत त्यांनी सर्व बीलेही भरली आहेत. मात्र, गेले सहा महिन्यांपासून कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत आहे. पाण्याअभावी बागायती करपून गेली आहे. भाजीपाला व रब्बी पिकांचेही नुकसान झाले. यात त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले शेतीकर्जही थकले आहे. तसे पत्रही त्यांनी बँकेला दिले आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या बांदा व सावंतवाडी विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपोषण करण्यात आले. त्यावेळी कुडाळचे अधीक्षक अभियंता यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या ४ दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा शेतकरी शांताराम सावळ यांनी दिला आहे.