वनविभाग का ठरतोय अपयशी ; पाडलोस येथील शेतकर्याचा आर्त सवाल.
बांदा | राकेश परब : गेली १० वर्षे सामान्य शेतकरी हा निसर्गाच्या अनेक आपत्तींना सामोरे जात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस येथे चवळी पिकासाठी गेले ३ महिने घेतलेली मेहनत एका रात्रीत गवा रेड्यांनी फस्त केली. काढणीयोग्य झालेले चवळी पीक जागेवर उभे दिसत नसल्याचे विदारक दृष्य पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्यामुळे वनविभाग गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने शेतात राबायचे तरी कशाला असा आर्त प्रश्न आता पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी उपस्थित केला.
गेल्या ३ महिन्यांची मेहनत फळाला आल्याचे समाधान वाटत होतेच तोपर्यंत पाडलोस केणीवाडा येथे बुधवारी रात्री गव्यांचा कळप चवळी पिकात घुसला. एका रात्री रानगव्यांनी चवळी पिकाचे नुकसान केले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा म्हणून आम्ही दरवर्षी रब्बी पिकांसह भाजीपाला लागवड करतो. रात्री फटाके व विजेरीच्या साहाय्याने काही वेळ पिकाचे संरक्षण करतो. परंतु वनविभागाच्या अपयशामुळे मेहनत वाया जातेय याचे दु:ख वाटते. नांगरणी, पिकाची किंमत, मजुरी याची सांगड घालत दोन ते तीन हजार उत्पन्न देणारी चवळी तयार झाली होती. गवे शेतात फिरल्यानंतर बहुतांश पीक त्यांच्या मोठ्या पायाखाली तुडवले गेले. त्यामुळे आमच्या हाती पिकातील एक दाणा येताना अवघड झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे आमचे आर्थिक गणित कोलमडून गेल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
गव्यांचा बंदोबस्त करणे वनविभागाला शक्य नसल्याने रानगव्यांकडू रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. भरपाईच्या जाचक निकषांमुळे आम्हाला तुमची भरपाई नको परंतु प्रत्यक्ष पाहणी करत उर्वरीत पिकाचे संरक्षण कसे केले जाईल यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.