शासन,प्रशासन तथा अधिकारी वर्गाने सुद्धा ही जत्रा ‘आपलीच आहे’ या भावनेतून काम करणे आवश्यक असल्याचे दिले स्पष्ट निर्देश.
मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गांवच्या आंगणेवाडी येथील आस्थेची शिरोमणी असलेल्या श्री भराडी देवी जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कमीत कमी त्रास यात्रा परिसरात होईल अशा दृष्टीने शासन आणि प्रशासनाने नियोजन पूर्ण करणे आवश्यक आहे. अधिकारी वर्गाने सुद्धा ही जत्रा आपली आहे या भावनेतून या ठिकाणी काम करणे आवश्यक आहे. आंगणेवाडी येथील रस्त्याची कामे पूर्णत्वास गेली असून प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय भाविकांची होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. जत्रोत्सवापूर्वी उर्वरित सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये कुठलीही त्रुटी राहता कामा नये अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे अधिकारी वर्गाला दिल्या.
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सव ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होत आहे. जत्रा पूर्व नियोजनाबाबत आंगणेवाडी येथे गुरुवारी भेट देत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी सुचवलेल्या सूचनांप्रमाणे कामे पूर्ण झाली आहेत अथवा नाही याबाबत आढावा घेतला तसेच काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याबाबत निर्देश दिले.यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली, आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, भाजप महिला अध्यक्ष संध्या तेरसे , जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मंडळ पदाधिकारी बाळा आंगणे, प्रभाकर सावंत, महेश बागवे, महेश मांजरेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आंगणेवाडी मध्ये मोबाईल रेंज बीएसएनएलची असून येणाऱ्या भाविकांना एकमेकांशी संपर्क साधणे अधिक सोपे जावे याच्यासाठी जिओचा हंगामी टॉवर आंगणेवाडी मध्ये यात्रोत्सवापूर्वी उभारण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी पाच किलोमीटर वरती मोबाईल टॉवर व्हॅन उभ्या केल्या जाणार आहेत.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी आंगणेवाडी येथे भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जत्रोत्सवापूर्वी आंगणेवाडी मध्ये टँकरद्वारे जास्तीचा पाणीपुरवठा नियमित केला जाईल आणि त्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. बाळा आंगणे यांनी हंगामी एसटी स्टॅन्ड परिसरात रात्रीच्यावेळी खिसे कापू पासून भाविकांना त्रास होतो त्याबाबत पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे मागणी केली. मागणीनुसार स्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस विभागामार्फत लावण्याचे सांगण्यात आले. तसेच मंदिर परिसरामधील लाईट व्यवस्थेचा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या वतीने दूर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
आंगणेवाडी येथे मसूरेकडील बाजूने बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडचा वापर संध्याकाळी सात नंतर होत नसल्यामुळे व्हीआयपी रस्त्याने येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सायंकाळ नंतर हेलिपॅड वर केल्यास बऱ्याच प्रमाणात दत्तघाटी येथील वाहतुकीवर येणारा ताण कमी होणार आहे असे महेश बागवे यांनी सांगितले. याबाबत कार्यवाहीचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आई भराडी मातेचे दर्शन घेतले. मालवण तालुका भाजपच्या वतीने अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत केले.
जत्रा नियोजन आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप तर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाचे तसेच मेळावा स्थळाची पाहणी केली व आवश्यक सूचना केल्या. आढावा बैठक प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभागीय अभियंता अजित पाटील, शाखा अभियंता प्रदीप पाटील,मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, गणेश गोवेकर, दिनेश आंगणे, स्वप्नील धामापूरकर, नंदू आंगणे, समीर आंगणे प्रसाद मंगेश आंगणे, गणेश आंगणे, तसेच आंगणे कुटुंबीय उपस्थित होते.