विवेक परब | ब्युरो चीफ : चिपळूणच्या तारांगण गृपचे सदस्य श्री. दीपक आंबवकर यांनी आज रात्री आकाशात शुक्र आणि शनी ग्रहांची युती दिसण्याची माहिती दिली आहे.
श्री. आंबवकर यांनी डिसेंबर २०२२ पासून अवकाश निरीक्षणाचे ११ कार्यक्रम केले असून १००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि खगोल प्रेमींना आकाश दर्शन घडविले आहे. हे अवकाश निरीक्षण करीत असताना त्यांना नवीन गोष्टी लक्षात आल्या. सतत अवकाश निरीक्षणात त्यांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या वर्षी मंगळ,गुरू,शुक्र आणि शनी हे चारही ग्रह डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ या महिन्यात एकाच वेळी पाहायला मिळाले आणि शुक्र १५ डिसेंबर नंतर आकाशात दिसायला सुरुवात झाली आणि त्या नंतर त्याचा मावळण्याचा वेळ वाढत गेला.
तर शनी मात्र वेगाने रोज पश्चिमेकडे प्रचंड वेगाने सरकताना दिसला आणि असे लक्षात आले की या दोन ग्रहांची युती आज रविवारी २२ जानेवारी २०२३ ला आहे. म्हणजे हे दोन ग्रह एकमेकांच्या एकदम जवळ आलेले दिसतील.
रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर ७.१५ नंतर बऱ्यापैकी अंधार पडायला लागलेला असेल.त्या वेळी पश्चिमेला तोंड करून उभे राहिल्यास एक तेजस्वी चांदणी आकाशात दिसेल ती चांदणी म्हणजे शुक्र ग्रह आहे.आणि बरोबर त्याच्या अगदी जवळ वरच्या बाजूला पिवळसर अंधुक एक चांदणी दिसेल ती चांदणी म्हणजे शनी ग्रह असेल.हे ग्रह आपल्याला आकाशात अगदी जवळ आलेले दिसतील तरी प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांपासून कोट्यवधी कि.मी. अंतरावर असणार आहेत.
२३ जानेवारी म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी बरोबर उलट परिस्थिती दिसणार आहे. ती म्हणजे शनी शुक्राला ओलांडून पश्चिमेकडे गेलेला दिसेल म्हणजे या दिवशी शनी खाली असेल तर त्याच्या बरोबर वरच्या बाजूला शुक्र ग्रह असेल.हे दोन्ही दिवस खगोल निरीक्षकांसाठी खूप महत्वाचे आहेत.या दोनही दिवशी या ग्रहांच्या स्थानात होणारा बदल उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.(चांदणीच्या स्वरूपात.)
टेलीस्कोप मधून हे दोनही ग्रह एकाच वेळी एकाच लेन्स मधून पाहता येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि खगोल प्रेमींनी या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा असे आवाहन तारांगण गृप,चिपळूण यांचे सदस्य श्री. दीपक आंबवकर यांनी दिली आहे.