कुडाळ | देवेंद्र गावडे : अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) कुडाळ प्रकल्पांतर्गत तालुका संघटनेने मंगळवारी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लक्ष वेधले. सरकारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडावे, अशी मागणी यावेळी आमदार नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही आमदार नाईक यांनी यावेळी दिली.
आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत. सध्या प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. २०१८ पासून गेली ५ वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो, आश्वासनापलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा ॲप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. २०१८ ला आम्हांला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी बहुतांशी मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खासगी मोबाईल वापरा म्हणतात, कारवाईच्या धमक्या देतात, आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात. १५ नोव्हेंबरला मुंबई विधानसभेवर अंगणवाडी कृती समितीने मोर्चा नेला. दिवाळीपूर्वी मानधनवाढ करणार असे सांगणा-या महिला व बालविकास मंत्री नाम. मंगलप्रभात लोढा यांनी मोर्चासमोर येऊन एक महिन्याची मुदत द्या. आपण मानधनवाढ देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुढे काहीच झाले नाही म्हणून, नागपूर विधानसभेवर २७ डिसेंबरला मोर्चा नेण्यात आला. तिथेही आपण सकारात्मक आहे, मुख्यमंत्र्यांना भेटा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्यावा. दरम्यानच्या कालावधीत किमान वेतन सेविकांना व मिनी सेविकांना १८ हजार रुपये, मदतनीसना १५ हजार रुपये दरमहा द्यावेत. सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत. पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे. कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करावेत. अंगणवाडी कर्मचा-यांची सध्या भरती प्रक्रीया बंद करण्यात आल्याने रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशा आमच्या विविध मागण्या आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी आ.नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आ.नाईक यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या मागण्यांबाबत न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संघटनेच्या कुडाळ अध्यक्षा दिपाली पठाणी, मानसी पाटकर, शैलजा कांबळी, निता पवार, प्रभावती घाडी, सरिता घाडी आदींसह अंगणवाडी कर्मचारी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, विकास कुडाळकर, कृष्णा धुरी, उदय मांजरेकर, रूपेश पावसकर, योगेश धुरी, सचिन काळप, मिलिंद नाईक, संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.