राजापूर । ब्युरो न्यूज : भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार डाॅ. निलेश राणे मंगळवारी १३ डिसेंबरला राजापूर तालुका दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात निलेश राणे हे राजापूर तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आणि हातिवले येथील टोलवसुलीविरोधातील आंदोलनाबाबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह टोलविरोधी संघटनांशी चर्चा करणार आहेत.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तशी माहिती तालुका सरचिटणीस मोहन घुमे यांनी दिली आहे.
तालुक्यात ३१ ग्रामपंचातींया पंचवार्षिक निवडणूका जाहिर झाल्या होत्या. यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर ९ ग्रामपंचायींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित ठिकाणी १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर राजापुरात महामार्गावर हातिवले येथे टोल वसुली केंद्र उभारण्यात आले असून रस्ता पुर्ण झालेला नसतानाही टोलवसुली केली जात आहे. त्याला राजापूरकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या एकूणच पार्श्वभुमिवर भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे हे मंगळवारी राजापुरात येत आहेत. दुपारी २ वाजता राणे राजापुरात दाखल होणार असुन राजापूर शासकिय विश्रामगृहावर ते ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, उमेदवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी ३ वाजता ते राजापूर शहरातील नगर परिषदेच्या जवाहर चौक येथील पिकअप शेड सभागृहात टोलमाफी बाबत सर्वपक्षिय पदाधिकारी, विविध वाहतुक व अन्य संघटना, व्यापारी यांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. टोल वसुलीला निलेश राणे यांचा प्रारंभीपासूनच विरोध केला असून जर जबरदस्तीने टोल वसुली केली तर खपवून घेणार नाही असा ईशारा यापुर्वीच राणे यांनी दिला आहे. जोपर्यत रस्ता पुर्ण होत नाही, स्थानिकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली नको अशी स्पष्ट भुमिका राणे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे राजापुरातील टोल वसुली विरोधात लढा देणाऱ्यांना भक्कम पाठबळ देण्यासाठी राणे राजापुरात येत आहेत.
राजापुरातील या दोन्ही कार्यक्रमानंतर निलेश राणे हे आडिवरे विभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी ६ वाजता तावडे भवन येथे ही बैठक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस मोहन’ यांनी केले आहे.