काल ओसरगांव टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांच्या टोलमाफीसाठी केले होते आंदोलन.
कणकवली | प्रतिनिधी : काल शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झाली पाहिजे अशी मागणी करत ओसरगाव येथील टोल नाक्यावर घोषणाबाजी करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहेत. या दरम्यान काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी झाली पाहिजे अशी मागणी करत शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी या टोलनाक्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. दरम्यान शिवसेना झिदाबादच्या जोरदार घोषणा देखील देत होते असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार या प्रकरणी वृषाली बर्गे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संदेश पारकर, हर्षद गावडे, प्रथमेश सावंत, सुदाम तेली, प्रभाकर सावंत, रिमेश चव्हाण, उमेश लाड, अनंत पिळणकर, मंगेश बावकर, धनंजय हीर्लेकर, बाबू तावडे, पांडुरंग कारेकर, सचिन राणे, चंदू परब, संतोष सुतार यांच्यावर मनाई आदेश भंगप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे हवालदार मनोज सुतार करत आहेत.
( फोटो सौजन्य – कणकवली ब्यूरो)