कोकणातील आनंदमय वनभोजन एकात्मतेचे प्रतिक.
श्रावण | गणेश चव्हाण :
कोकणात तथा खासकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकात्मतेने पारंपरीक धार्मिक सण वार्षिक नेटकेपणाने साजरे केले जातात. श्री गवळदेव सण हा त्यापैकी एक असतो. सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेला, हा गवळदेव श्रावण गवळीवाडी टेंब येथे अशाच मोठ्या श्रध्देने एकत्ररीत्या साजरा केला जातो.
आपल्या पाळीव जनावरांना जिवापलीकडे जपणाऱ्या व गोवंशाची काळजी घेणाऱ्या अशा निसर्ग देवतेप्रति श्रद्धेच्या भावनेचा हा उत्सव येथे साजरा केला जातो. कोकणात भात कापणीची कामे संपली की, गवळदेवाच्या कार्यक्रमांचे वेध लागतात. दिवाळी नंतर शनिवार किंवा रविवार असा मुलांच्या सुट्टीचा एक दिवस ठरवीला जातो व वाडीतल्या बाळगोपाळांना एकत्र जमवून रानातील गवळदेवाची पूजा-अर्चा केली जाते, सामूहिक भोजन (वनभोजन) केले जाते. आठवणीत राहाणारा स्वादीष्ट वनभोजनाचा असा कोकणातील हाच गवळदेव कार्यक्रम.
गवळदेवाच्या ठिकाणी सर्वजण चुलीवर गावठी तांदळाचा भात, भोपळ्याची भाजी, डाळ, वडे आदी पदार्थ शिजविले जातात. नैसर्गिक वातावरणात या पदार्थांचा स्वाद अजुन पसरतो. आणि खरे पोट या स्वादाच्या वासानेच भरते. गवळदेवाची पूजाअर्चा करून, गार्हाणे सांगतात.
काही ठिकाणी वाघोबाची शांतीया, जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी केली जाते. जंगलातील वाघाला शांत करण्यासाठी त्याच्या नावाने एक वाडी (नैवेद्य) काढून ठेवण्याची प्रथा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एखाद्या युवकाला वाघ बनवून (चेहरा वाघासारखा करुन) त्याला प्रसाद खाण्यास दिला जातो. व त्या नंतर तोंडात वडा पकडून या प्रतिकात्मक वाघाला पळविले जाते. व त्या नंतर सर्व ग्रामस्थ एकत्र महाप्रसाद घेतात. अशी प्रथा श्रावण गवळीवाडी टेंब येथे नसली तरी शिवारा नावाने या वाघाला नैवेद्य दाखवला जातो. कारण त्या काळी वाघाची जणावरांना भीती होती. वाघ जणावरांवर हल्ला करीत असे. कदाचीत त्याला शांत करण्याची ही पध्दत असावी.
यावर्षी श्रावण गवळीवाडी टेंब येथेही नुकताच गवळदेव कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त गुराख्यांबरोबर सर्व ग्रामस्थ हेवेदावे व भांडने विसरुन एकत्र स्वादीष्ट व सुखकारी अशा वनभोजनाचा आनंद घेतला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता, रात्री १० वा. बुवा संजय चव्हाण यांच्या सुश्राव्य भजनाने झाली. यावेळी श्रावणचे माजी सरपंच अंकुश लाड, गावकर प्रमोद गवळी, मयुरेश गवळी, महेश गवळी, संतोष गवळी, सुर्यकांत पंदारे, हरेश चव्हाण, गुरुप्रसाद चव्हाण, प्रणय चव्हाण, जगदीश चव्हाण, राजु चव्हाण, व बालगोपाळ उपस्थित होते.
( फोटो सौजन्य : प्रातिनिधिक)