श्रावण | गणेश चव्हाण :
संगणक व मोबाईलच्या युगात संस्कार लोप होत चालले आहेत. अती वापराने आपला विनाश आहे, हे माहिती असूनही मोठ्यां पासून लहान मुलांपर्यंत सर्वच जण मोबाईलचे वेड लागले. तरीही काही निवडक संस्कारक्षम मुले आहेत. संस्कारीत मुले कशी असावीत याचे उदाहरण मालवण तालुक्यातील श्रावण गवळीवाडी येथील अर्णव गवळी या सात वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलापासून, विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे.
शेतकरी, व्यावसाईक किंवा नोकरवर्गाची मुले मोबाईल वरील गेम खेळण्यात व्यस्त दिसतात. दिवाळी सुट्टीतील अभ्यास करुन शेतीची आवड असलेला दुसरीतील विद्यार्थी कु. अर्णव महेश गवळी हा लहान वयातही शेतीच्या सर्वच कामांत नेहमी व्यस्त असतो .जुन पासून मृग नक्षत्राचा पाऊस पडला की, सुट्टीच्या दिवशी शेत नांगरणी वेळी इतर कामे, पेरणी, रोप लावणी, कापणी, झोडपणी, मळणी, गवत सुकवून गवताची उटी मांडणी करण्यापर्यंत सर्व कामांत अर्णव आवडीने वडीलांना मदत करत असतो. यावर्षी परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, बळीराजा सुखावला. आणि आपले व जणावरांचे वर्षभराचे खाद्य तयार करण्यास वेळ मिळाल्याने, स्वतःच्या पोटाबरोबर जनावरांच्या पोटाचीही काळजी शेतकरी घेत आहेत. जणू हेच प्रशिक्षण आज अर्णव गवळी घेत आहे.