संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यपदाधिका-यांनी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांची मंत्रालयात भेट घेऊन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील गुणवंत शिक्षकांना दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून दोन शिक्षकांना राज्य पुरस्कार व राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या शिक्षकांना मात्र इतर राज्यांप्रमाणे सुविधा मिळत नसल्याने या शिक्षकांमध्ये नाराजी आहे. इतर राज्यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात तसेच प्रलंबित प्रश्न वेळोवेळी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करूनही सुटत नसल्याने राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव, अर्थ विभागाचे सचिव यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करून अद्यापही शासनाकडून या प्रश्नाकडे लक्ष देण्यात येत नसल्याने विविध प्रश्नाविषयी सकारात्मक विचार करून सोडविण्याची मागणी केली आहे.
तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक हे उपक्रमशिल शिक्षक आहेत. त्यांच्या ठिकाणी असलेल्या विविध गुणांचा व उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षकांना होण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक संवाद चर्चासत्र व शैक्षणिक परिषद घेण्यासाठी विशेष रजा मंजुर करून संघटनेच्या व्यासपिठावरून शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात .यामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना २०१४ पासुन जादा वेतनवाढ बंद करण्यात आल्या आहेत. त्या वेतनवाढी पुर्ववत सुरू कराव्यात. न्यायालयाने आदेश देऊनही वेतनवाढ बाबत अमंलबजावणी होत नाही त्यामुळे शिक्षण संचालक, उपसंचालक यांना आदेशीत करावे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांप्रमाणे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायमस्वरूपी ओळखपत्र व रेल्वे, बस प्रवास सवलत देण्यात यावी. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीसाठी विनाअट पदोन्नती देऊन राखीव जागा ठेवण्यात याव्यात, २०२२ चे राज्य पुरस्कार जाहीर करून वितरीत करण्यात यावेत, इतर राज्यांप्रमाणे सुखसुविधा देण्यात याव्यात, विविध शासकीय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करावी, तसेच २००६ ते २०१६ या कालावधीत पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, माहे ऑक्टोबर २०२२ चे शिक्षकांचे मासिक वेतन काही जिल्ह्यांमध्ये अदयाप झालेले नाही त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
या वेळी शिक्षण सचिव यांनी शिक्षणमंत्री यांचेशी चर्चा करून राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या शिक्षकांच्या शैक्षणिक परिषदेसाठी जानेवारी २०२३ मध्ये वेळ देण्याबाबत प्रयत्न करता येईल व शैक्षणिक परिषदेला ४ दिवसांची विशेष रजा मंजुर करण्यात येईल तसेच प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल व संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात येऊन आपल्या मागण्या व प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन संघटना पदाधिकारी यांना शिक्षण सचिव यांनी दिले. यावेळी राज्याध्यक्ष – सुभाष जिरणकर ,राज्य कार्याध्यक्ष – दशरथ शिंगारे,राजप्रवक्ता -सुनिल गुरव,राज्य सहसचिव – माधव वायचाळ, राज्य सरचिटणीस – अनंता जाधव ,पुणे जिल्हाध्यक्ष -भिमराव शिंदे,ठाणे जिल्हाध्यक्ष – विजयकुमार देसले ,राज्य महिला प्रतिनिधी -चंदाराणी कुसेकर , कोल्हापूर जिल्हा -सरचिटणीस नवनाथ व्हरकट, राज्य संपर्क प्रमुख -प्रदिप शिंदे कोकण विभाग कार्याध्यक्ष – आनंद जाधव ,किशन घोलप हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.