आजपासून दीपोत्सवाला सुरूवात…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
हिंदू धर्मात प्रत्येक सणाला खूप विशेष धार्मिक महत्व आहे. विजयादशमी (दसरा) नंतर सर्वांना विशेष चाहूल लागते ती दिवाळीची. कुणी हिला दिवाळी, दीपावली, दीपोत्सव म्हणतो. मात्र लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच मनापासून दिवाळीची ओढ, आवड असते. अतिशय उत्साहाचा मांगल्याचा हा सण मानला जातो. जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय करणारा हा सण. सुमारे ३ हजार वर्षापूर्वी भगवान श्री रामचंद्रांनी १४ वर्षे वनवास संपऊन अयोध्यात परतले. त्या दिवसापासून हा दिवाळी सण साजरा केला जातो असे सांगितले जाते.
आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते. या दिवशी धनाची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे सर्वजण उठून सुगंधी उटण्याने आंघोळ करतात आणि तुळशी पुढे जाऊन कारेटे ( नरकासुर समजून) फोडले जाते. चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेची आणि केरसुणीची पूजा केली जाते. त्यानंतर येते ती बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. आणि मग शेवटचा सण म्हणजे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवळणी करून गोड पदार्थ भरऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. मग भाऊ तिला आवडीने भेटवस्तू देतो.
अशा या दिवाळी सणात सर्वजण नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेछा देतात. दारात सुरेख रांघोळी, सायंकाळी दीप लावणे, आकाश कंदील लावणे, सर्वत्र दिव्यांची रोषणाईने घराचा परिसर उजळून निघतो.
घरातील महिलावर्ग या चकल्या, चिवडा, करंज्या,लाडू,शंकरपाळी बनविण्यात दंग असतात. मुलांना दिवाळीची स्पेशल सुट्टी असल्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. फटाके वाजविण्यात ते मग्न असतात.
या दिवाळी सणात प्रत्येकाच्या दारी आकाश कंदील लटकलेले हमखास दिसते. दाराला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांनी तोरणे सजविलेली दिसतात. कोरोना नंतर चा हा दिवाळी सण सर्वांसाठी आनंददायी, सुख समाधानाचा आहे.
उटण्याची आंघोळ…
फटाक्यांची माळ…
रांगोळीची रंगत…
फराळाची संगत…
विजेची रोषणाई…
पणत्यांची नवलाई…
लक्ष्मीची आराधना…
सर्वांची उपासना…
बहीण भावाची ओढ…
दिवाळी सण आहे गोड..
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे…
लक्ष्मीच्या पावलांनी तुमचे घर सुख समृध्दीने भरू दे…
दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंत साजरा होत असलेल्या या आनंदमयी, मंगलमयी, उत्साहमयी पवित्र सणाच्या सर्व दर्शकांना आपली सिंधूनगरी न्युज परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमचे सर्वांचे आयुष्य सुख समाधानाचे, ऐश्वर्याचे, धनदौलतीचे, भरभराटीचे, मांगल्याचे, दीर्घायुष्याचे जावो. हीच शुभेच्छा. शुभ दीपावली.