संविता आश्रम पणदूर व सक्षम आश्रम किनळोस येथे तीन दिवसीय निवासी शिबीर संपन्न…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
पोलीस, सैन्य आणि प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींमध्ये सामाजिक समस्यांची सजगता निर्माण व्हावी.ज्ञान,कष्ट,श्रम आणि माणसातील ओलावा वाढवा जेणेकरून परिवर्तन घडेल या हेतूने गुरुकुल करिअर ॲकॅडमी,ओरोसच्या वतीने संविता आश्रम पणदूर व सक्षम आश्रम किनळोस ता. कुडाळ येथे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये गुरुकुल करिअर ॲकॅडमीच्या ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी घडविताना प्रशासकीय कर्मचाऱ्यातील माणूस घडविण्याचे ध्येय गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोसची सारी टीम नेहमीच जपत असते.
याचाच एक भाग म्हणजे संविता आश्रम येथील ‘” धडा माणुसकीचा” हे तीन दिवसीय निवासी शिबिर होते. याची सुरुवात 14 ऑक्टोबर रोजी सकाळी आणाव येथील आश्रमापासून करण्यात आली. जून महिन्यात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या 700 पेक्षा अधिक आंबा झाडांची साफसफाई करण्यात आली. रुग्णसेवा,आश्रम परिसर स्वच्छता, पाण्यासाठी पाट व्यवस्था, बांधकाम साहित्याची व्यवस्था, बंधारा, हौद अशी आश्रमाशी निगडित अनेक कामे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आनंदाने केली.
श्रमदानाबरोबरच आश्रमातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी समाज प्रबोधन करणारे नाटक, विविध खेळाचेही आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. शिबिराची सुरुवात सकाळी सहा वाजता योगासने प्राणायाम अनुलोम-विलोम प्रार्थना राष्ट्रगीताने होत होती. संविता आश्रमातील सर्व कर्मचारी आणि संचालक संदीप परब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे आणि माणूस म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची शिकवण दिली.शिबीर यशस्वी करण्याकरिता विद्यार्थी विद्यार्थ्यीनी आणि मार्गदर्शक वर्गानेही खूप मेहनत घेतली होती.