जैवविविधता जपणे ही आजची महत्वाची गरज असल्याचेही केले स्पष्ट.
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : माजी केंद्रीय मंत्री व पर्यावरण तसेच अर्थकारणाचे गाढे अभ्यासक श्री.सुरेश प्रभू यांनी जागतीक मंदी व पर्यावरण अशा विषयांवर सावंतवाडी संस्थानात पत्रकारांशी संवाद साधला. सावंतवाडी संस्थान येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपचे युवा नेते युवराज लखन राजे भोसले तसेच अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच सध्या जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम होणार असल्याने भविष्यात जनमानसावर परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होत आहे. जगातील अनेक देशातील नद्या ह्या कोरड्या पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारा ठरेल. जगाची परिस्थिती ही आयसीयूमध्ये असल्यासारखी होण्याची शक्यता असल्याची भिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.
जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट आणि इंस्टंट घाट जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाट, इंस्टंट घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे.जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली असल्याची चिंता त्यांनी बोलून दाखवली.
(फोटो सौजन्य : सावंतवाडी ब्युरो)