संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
‘हर हर महादेव’च्या घोषात व ढोलताशांच्या गजरात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौऱ्याऐंशी खेड्याचा अधिपती असलेला देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिध्देश्वर पावणाई देवस्थानाचा दसरोत्सव शाही थाटात पारंपरिक पद्धतीत रितीरिवाजानुसार भाविकांच्या विक्रमी गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला. हा शाही थाटातील दसरोत्सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या दिवशी दुपारी श्री पावणाई देवी मंदिरात इशारत केली जाते. वस्त्रभूषणांनी सजविलेले देवतरंग (शिवकळा) काढण्यात येतात व शिवकळेकडून सिमोल्लंघनाचा हुकूम झाल्यावर ढोलताशांच्या गजरात,फटाक्यांची आतषबाजी हर हर महादेवच्या घोषात देव तरंगाबरोबर निशाणदार, भालदार चोपदार, मशालदार, चौरवीदार, अबदागीर, घडशी गोंधळी, देवाचे सेवेकरी अशा लव्याजम्यासह बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, असंख्य भक्तगण सिमोल्लंघनासाठी आपट्याच्या झाडाकडे रवाना होतात. तेथे आपट्याच्या झाडाची ब्राह्मणाकरवी पुजा करण्यात आली. आपट्याच्या झाडांची पाने (सोने) म्हणून लुटण्यात येतात. त्यानंतर माघारी येताना चौऱ्याऐंशीच्या चाळ्याला भेट देतात व नंतर श्री गांगेश्वर-विठ्ठलाई देवीला भेट देण्याचा रिवाज आहे. त्यानंतर श्री देव सिद्धेश्वर, श्री पावणाई देवी व श्री रवळनाथ देवालयाभोवती फेरी मारून पाषाणाची भेट घेतात. त्यानंतर देवता पापडीवर गेल्यावर असंख्य भक्तगण देवास सोने अर्पण करून कृपाशिर्वाद घेतात. येथील शाही थाटातील दसरा सोहळा ‘याची देही याची डोळा पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यादिवशी देवीची ओटी भरण्यासाठी व कृपाशिर्वाद घेण्यासाठी माहेरवाशिणी येतात. तसेच बाहेर गावस्थित ग्रामस्थ, चाकरमानी आवर्जुन येतात. भाविकांच्या अलोट गर्दीत मंदिर परिसर फुलून गेला होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा मंदिराचा परिसर भक्तीमय करून टाकतो.