कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळील नडगिवे इथे आज सकाळी १०:३० वाजता गणेश कर्ले यांच्या हॉटेल सिद्धिविनायक समोर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका आणि अवजड वाहन कंटेनर तसेच आयशर टेम्पो या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
या अपघातामध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण नडगिवे येथे खारेपाटण प्राथमीक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका वाहन क्र. एम एच ०७ ए. जे. २३३९ ही गाडी चालक मारुती जोशी हे नडगिवे येथील गणेश कर्ले यांच्या सर्विसिंग सेंटरवर गाडी सर्विसिंग करण्यासाठी घेऊन आले होते. याच दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन क्र. GT 15 YY 9604 चालक पिंटोसिंग यादव वय ३३ राहणार – मोहरत बिहार हा भरधाव वेगात घेऊन येत असताना समोर उभा असलेला आयशर टेम्पो वाहन क्र. एम. एच. ०४ जेके ४३२४ याला घासत सर्विसिंग सेंटर मध्ये आत प्रवेश करणाऱ्या खारेपाटण प्रा.आ केंद्राच्या रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्यामुळे या तीन वाहनांचा अपघात झाला यात खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताची माहिती कळताच नडगिवे गावचे सरपंच, खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली व मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस उद्धव साबळे, पराग मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने भेट अपघाताची माहिती घेतली व घटनेचा पंचनामा केला. या अपघातात आयशर टेम्पो चालक उल्हास जानबा वय – ४१ हा मुंबई गोवा महामार्गावर नडगिवे येथे गणेश कर्ले येथे चहासाठी थांबला असता त्याच्या गाडीला सुद्धा कंटेनरने धडक दिल्यामुळे गाडीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
खारेपाटण प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ घोपे, डॉ. प्रिया वडाम यांनी देखील घटनस्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली.
दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे अवघड वळणावर काम ठप्प असलेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन अपूर्ण रस्ते पूर्ण करणे आवश्यक आहे अशी मागणी आता होत आहे . या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करीत आहेत.