आपली सिंधू नगरी चॅनेल इफेक्ट…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शिरगांव – कुवळे मार्गावर बुधवारी बाजाराच्या दिवशी झालेल्या अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे तोडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारपासून सुरुवात केली आहे.याबाबत साळशी सरपंच वैभव साळसकर यांनी आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेल मार्फत संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असता तत्काळ झाडी तोडण्यास सुरवात करण्यात आली.
प्रशासनाच्या या कारभाराबाबत ‘देर आए पर दुरुस्त आए’, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.
शिरगांव पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसाद साटम यांच्या कलम बागेजवळील अवघड वळणावर बुधवारी एस.टी बस आणि जीप यांच्यात समोर समोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील २४ प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या होत्या. यावेळी साळशी गावचे सरपंच वैभव साळसकर यांनी सर्व प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम खात्याला वारंवार लेखी निवेदने देऊन तसेच दूरध्वनीवरून अधिकारी वर्गाशी संपर्क साधूनही रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही अशी अपघाताच्या घटनास्थळीच खात्याच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अपघाताला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार आहे, या खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे अशा कडक शब्दात ताशेरे ओढले होते. विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकान्यांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती साळशी सरपंचांची ही प्रतिक्रिया आपली सिंधुनगरी चॅनेल ने प्रसिद्ध केली होती. अपघातानंतर आता २४ तासांतच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली आणि गुरुवारी सकाळपासूनच साळशी गावापासून शिरगावच्या दिशेने वाढलेली झाडी झुडपे तोडण्यास सुरुवात केली.
शिरगांव- कुवळे मार्गावर बहुवास ठिकाणी तर रस्त्याची पार चाळण झाली असून रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी काहीशी या नागांची परिस्थिती आहे, मार्गावरील झाडी झुडपे तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते या मार्गावर अपघातानंतर जीवित अथवा वित्तहानी होण्याची वाट पाहत होते काय? अपघातानंतर झाडीझुडपे तोडण्याचे या खात्याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे की देर आये पर दुरुस्त आये अशा मार्मिक प्रतिक्रिया वाहनचालक आणि ग्रामस्थातून उमटत आहेत.