देवेंद्र गावडे | उपसंपादक : हल्ली कोणताही सामना अटीतटीचा झाला कि ‘मॅच फिक्स्’ तर नाही ना..असा किडा डोक्यात वळवळल्याशिवाय रहात नाही. त्यात त्या आयपीएलच्या निमित्ताने अटीतटीच्या सामन्यांचा इतका रतीब घातला गेलाय की त्याची धारंच बोथट होऊन अंगावर शहारे येणे,हार्टबिट्स् वाढणे,मुठी आवळल्या जाणे आणि सामना जिंकल्यावर जोशात मारलेली उडी आणि टाळी पे टाळी वाले प्रकार इतिहासजमाच झाल्यात जमा आहेत.
कालचा आशिया चषकाचे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा आधीच्या पाकिस्तानी संघाबरोबर होणा-या सामन्यांच्या तुलनेत फार वेगळा होता.
समालोचक व माजी कसोटीवीर आकाश चोप्राने एका ओळीत याचं अगदी च़पख़ल वर्णन केलं होते कि पहले कि टीमे ‘जजबातों’से खेलती थी लेकीन इस टीम के पास ‘जजबा’ है..!
बाबर आजमने स्वतःच्या व्यक्तिमत्वातले ‘कामनेस्’ आणि ‘मेन्टल बॅलन्स’ हे दोन्ही गुण काही अंशी नक्कीच स्वतःच्या संघात उतरवलेत.त्यात रिझवान वगैरेंसारख्या संघातल्या समकालीन सहका-यांची उत्तम साथ लाभते. स्फोटक गोलंदाजीसाठी जाणल्या जाणा-या या संघात तोडीस तोड फलंदाज देखील आहेत.
पाकिस्तानच्या कोणत्याही कार्यात किंवा क्षेत्रात एक प्रकारचा ‘आक्रस्ताळेपणा’ जाणवतो तो संघामधून ब-याच प्रमाणात कमी करण्यात बाबरला नक्कीच यश आले आहे. निव्वळ ‘आक्रमकता’ प्रतिस्पर्ध्याचे फारसे काही वाकडे करू शकत नाही पण त्याच ‘आक्रमकतेला’ जर ‘मेंदू’ची योग्य जोड मिळाली कि ती प्रतिस्पर्ध्यासाठी जास्त घातक ठरते म्हणून या आधीच्या संघांपेक्षा पाकिस्तानचा आताचा संघ जास्त ‘घातक’ किंवा बहोत लंबे तक जायेगा असा वाटतो.
दुबईची कालची खेळपट्टी जेंव्हा ‘बेस्ट फ्रेंड्’ सारख्या भुवनेश्वरला चार विकेट आणि हार्दिकला तीन विकेट्सचं गिफ्ट देऊन गेल्या
तेंव्हाच आपल्याला समजायला हरकत नव्हती कि ती खेळपट्टी पाकिस्तानी गोलंदाजांना मोठ्ठे आणि स्पेशल गिफ्ट् देणारीच असणार होती. कारण दुबईच्या खेळपट्ट्या पाकिस्तानी गोलंदाजांसोबत ‘गर्ल फ्रेंड’ प्रमाणे वागतात हे सर्वश्रृत आहे.
पहिल्या षटकात पहिला बाॅल टाकणा-या नसिमने एकदम हलक्या हाताने सहज तो टाकला मनात आले यह तो आज बहोत पिटेगा यार पण दुस-याच बाॅलवर त्याने एक्स्ट्रा फोर्स लावत अत्यंत वेगात बाॅल टाकला आणि प्रथमच त्याच्या समोर आलेल्या के.एल्. राहूलच्या ‘चिपळ्या’ वाजल्या…! प्रथम दर्शनी वाटले की काय बाॅल टाकलाय राव…! झपकन आत वळणार…पण थेट यष्ट्याच उध्वस्त..! पण दुस-याचं क्षणी ॲक्शन रिप्ले मध्ये कळालं..कि के.एल. राहुल स्वतःच्या कर्माने गेलेला. बॅटची आतली कडा घेऊन यष्ट्यांच्या जवळपासही न फिरकणारा चेंडू त्याने स्वतःहून निमंत्रण देऊन यष्ट्यांवर आणून आदळलेली.अजिबात वाईट वाटले नाही कारण खराब फाॅर्ममधून जाणा-या राहुलकडून फार वेगळी अपेक्षा नव्हती.
विराटने आल्या आल्या पाकिस्तानला.”माझा फाॅर्म अजूनही खराब आहे बरं..”,असे वाक्य ठळकपणे अधोरेखीत करत पाकिस्तानला एक संधी दिली पण त्यांना ती घेता आली नाही .फिर क्या था ज़नाब तो कोहली आहे आणि मॅच पाकिस्तान बरोबर आहे त्यामुळे फाॅर्म खराब असला तरी तो त्या दिवसातलं आपलं ‘बेस्ट’ तो देऊनच जाणार होता आणि त्याने ते दिलं त्याचे कालचे द बेस्ट…!
अर्थात रोहितने आपली बॅट शांत ठेवत त्याला शक्य तेवढे खेळण्याची म्हणण्यापेक्षा खेळाचा आनंद लूटण्याची पूरेपूर संधी उपलब्ध करून दिली आणि जेंव्हा विराट बाद होऊन परतला तेंव्हा.
बरेच मोठे ‘गाठोडे’ घेऊन तो परतला ते त्याच्यासाठी किती महत्वपूर्ण होतं हे त्याचा त्यालाच माहिती असेल.
रोहित बाद झाला तोपर्यंत पायाभरणी झाली होती.
दहा षटकांनंतर तीन बाद आणि चौसष्ट-सहासष्ट धावांपर्यंत पोहचला असाल तर सामना पन्नास टक्के तूम्ही खिशात घातलाय असं म्हणायला हरकत नव्हती.
पण पाकिस्तान संघाची फार गंमत वाटते की ते अजूनही ‘टाॅप थ्री’ को जल्दी आऊट किया यामध्येच अडकून पडलेयत आणि तोच आनंद त्यांना आजही पुरेसा वाटतो. नेमके इथेच ते फसले.
तरी त्या दिवशी रोहित शर्माने प्रेस काॅन्फरन्समध्ये पाकिस्तानी पत्रकाराला सावध केलाए देखील “मेरी मेमरी बहोत शाॅर्ट टर्म है..मै सालभर पहले क्या हूआ ध्यान मे नही रखता..” सांगत त्याने ” आजचा दिवस महत्त्वाचा” हा कानमंत्र दिलेला .
हीच खरी मेख आहे..
अहो तूम्ही कुठे ‘टाॅप थ्री’ना घेऊन खूष होताय.सध्या हे टाॅप थ्री एक्का वेळेला जरी बाहेर बसले तरी भारतीय संघ सामना जिंकू शकतो इतके टॅलेंट आजही संघाच्या बाहेर ‘राखीव’ आहे..
सूर्यकुमार..जाडेजा..पंड्या..कार्तिक..चार चार ‘टाॅप मॅच फिनिशर’ घेऊन खेळतेय ही टीम..त्यांनी ‘पंत’ला बाहेर बसवलाय..इशान..गिल..धवन..अय्यर..तेजस्वी..बुमराह..शमी..कुलदीप..उदय..इत्यादि इत्यादि..आणखी किती आणि आणखी किती..?
तरी प्रियांक पांचाळसारखे कित्येकजण मायदेशी न्यूझीलंड अ संघाविरुध्दच्या सरावात मग्न आहेत.
‘टाॅप थ्री’ नाही तर तुम्हाला ‘टाॅपच्या टोटल थर्टी’चा अभ्यास करून प्लान घेऊन मैदानात उतरावं लागेल रे….!
पाय मुरगळला म्हणून नाहीतर..
हे जर तर काही नसतं आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना ‘फिटनेस्’ हा पाहीजेच तिथे पर्याय नाही…सबब चालतच नाही.
विराट कोहलीची खराब फाॅर्मनंतर आजही स्थिती ‘मजबूत’ आहे..कारण त्याचा जबरदस्त फिट्नेस आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना.पहिल्या वहिल्या यशानंतर मुळीच हूरळून जाऊ नये कारण कित्तीतरी कित्तीचतरी असे तारे या आंतरराष्ट्रीय क्रिकेटने पाहीलेयत जे पदार्पणात एकदम झपकन् चमकले आणि दुस-याच क्षणी भूतकाळाच्या काळ्या डोहात गडप झालेत.
त्यामूळे नसिम आणि दहानी दाखवू इच्छित असलेली दाहकता फिकी वाटली. तुम्ही लंबी रेसके घोडे नही है हम हे असं स्वतःच दाखवून देत असता हेच घातक.
नाक्यावर उभी राहणारी पोरं असतात ना त्यातले काही टगे छपरी सोडले तर बाकिचे आयुष्याचे तत्वज्ञान ब-यापैकि ‘कोळून प्यायलेले’ असतात.
कवी गुरू ठाकुर यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे..
“असे जगावे छाताडावर… आव्हानांचे लावून अत्तर..
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..!”
हे प्रत्यक्षात ते जगत असतात..
‘फिअरलेस्’..’निर्भय बना’..वगैरे व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरात शिकवले जाते पण ही निर्भिडता व्यक्तिमत्वात उतरणार कशी..? त्यासाठी आयुष्याचा ‘अर्क’ असा प्रत्यक्षात कोळून प्यावा लागतो.. तेंव्हा ते निर्भय..आणि निर्भिड व्यक्तिमत्व घडते.
त्याला ना शून्यावर बाद होण्याची तमा असते ना शतकांच्या आकडेवारीची फिकिर..! असते ती फक्त आपल्या दिशेने आग ओकत येणारा प्रसंग.
“हट् तुझ्या आयला”..म्हणत..कुंपणाच्या बाहेर भिरकावून देण्याची हिंमत..!
हार्दिक पंड्या..किंवा के. एल्. राहूलच्याजागी दूसरा कुणी असता तर कदाचित त्याचं करिअर काॅफी वुईथ करण प्रकरणानंतर संपले असते पण त्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये जो बदल घडवून आणलाय आणि जशा प्रकारे ते अशा उच्च स्तरावर डटके खडे है ते..काबिल ए तारीफ है..!
एनर्जी आणि प्रचंड एनर्जी योग्य प्रमाणात तसेच योग्य मार्गाला वळवली तर काय पराक्रम आपल्या हातून घडू शकतात याचे उत्तम प्रतिक म्हणजे कालचा सामना आणि त्या सामन्यातील हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी..!
जिओ..खेलो..जी जानसे..!
देवेंद्र गावडे, नेरुर ,कुडाळ ( उपसंपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)