भा.ज.यु.मो.चे शहर अध्यक्ष ललित चव्हाण व सहकार्यांनी वेधले होते लक्ष ; लवकरच संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने घेतला होता व्हिडिओ स्वरुपात आढावा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातून जाणार्या सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंब या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे प्राथमिक स्तरावर व तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट भरून बुजविले आहेत.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही डागडुजी करणे आवश्यक असल्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती.
सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंबपूल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये धडक देत निवेदन देत सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याची पाहणी करण्यास भाग पाडले होते. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिला होता. भाजयुमोच्या या दणक्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. सिमेंटच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजविण्यात आले. तसेच या रस्त्या लगतची झाडी देखील तोडण्यात येत आहे. येत्या काळात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ललित चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलने दिनांक 27 ऑगस्टला रात्री या मार्गाचा आढावा घेऊन त्याच्या तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला होता.