प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील,
शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल या प्रशालेचे सन १९३२ ते १९६० या २८ वर्षाच्या काळात मुख्याध्यापक म्हणून उत्तम कार्य करीत अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे स्व. डी. आर. खवणेकर सर यांचा प्रशालेच्या प्रांगणात ब्राँझचा अर्धपुतळा उभारून त्यांच्या कार्याचे स्मारक बनविण्याची संकल्पना त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी मांडली असून यासाठी निधी संकलित करण्यात येत आहे.
या निधी संकलनाच्या कार्यात प्रशालेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य करून योगदान द्यावे असे आवाहन भंडारी एज्युकेशन सोसायटी मुंबई मालवणचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
१२५ वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये १९३२- १९६० या काळात मुख्याध्यापक म्हणून स्व. डी. आर. खवणेकर सर यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. खवणेकर हे हाडाचे शिक्षक, आदर्श प्रशासक, संस्कृत व इंग्रजी विषयाचे व्यासंगी अध्यापक आणि प्रभावी वक्ते होते. विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास घेतलेले ते एक ध्येयवादी शिक्षक होते. डॉ. गजानन रानडे, सुप्रसिद्ध साहित्यिक कै. ह. मो. मराठे, अरविंद म्हापणकर, वसंत आंबेरकर, प्रकाश नाईक – साटम, रवींद्र वराडकर, सुहास वेर्णेकर, अशोक नाडकर्णी, डॉ. सदानंद मालवणकर, कै. महेंद्र नाटेकर अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना खवणेकर सरांचे मार्गदर्शन लाभले होते. अशा या गुरुवर्यांचे चिरंतन स्वरूपी स्मारक व्हावे अशी संकल्पना काही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेकडे मांडली होती. त्यासाठी अडीज लाख रुपयांचा निधीही जमा केला. गुरुवर्य खवणेकर सर यांचा ब्रॉंझचा अर्धपुतळा बनविण्यासाठी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आणखी अडीज लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. अपेक्षित निधी संकलित झाल्यास ६ डिसेंबर २०२२ पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे उर्वरित अडीज लाखांच्या निधीसाठी भंडारी हायस्कुलच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी सहाय्य करावे. इच्छुक आजी- माजी विद्यार्थ्यांनी भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई या संस्थेच्या नावे सारस्वत बँक शाखा मधूकेंद्र दादर (प.), मुंबई खाते क्र.00200100036927, IFSC Code- SRCB0000006 या बँक खात्यावर निधी जमा करून स्व. खवणेकर सर यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन अध्यक्ष विजय पाटकर यांनी केले आहे.