संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
बाजारपेठ मित्रमंडळ तळेरेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खास नारळी पौर्णिमेनिमित्त प्रथमच भव्य नारळ लढविणे स्पर्धेचा पहिला विजेता मानकरी ठरला विनायक दिलीप कल्याणकर तर आनंद कुबडे उपविजेता ठरला.
बाजारपेठ मित्रमंडळ तळेरे आयोजित खास नारळी पौर्णिमेनिमित्त प्रथमच भव्य नारळ लढविणे स्पर्धा तळेरे बाजारपेठ येथे काल दुपारी ठीक ३.०० वाजता आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
प्रथमच भरविण्यात आलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा आणि रसिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला होता.प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रत्येकी पाच नारळ मंडळाच्या वतीने मोफत पुरविण्यात आले होते.भर पावसामध्ये नारळ फोडण्याचा देखील पाऊसच पडत होता.संपूर्ण स्पर्धा रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
पहिल्या फेरीपासूनच रंगतदार सामने खेळले गेले.त्यामुळे उपस्थित रसिकांना देखील या स्पर्धेचा आनंद घेता आला.शेवटी अंतिम लढत विनायक कल्याणकर आणि आनंद कुबडे यांच्यात रंगतदार आणि लक्षवेधी ठरली.आणि यामध्ये विनायक कल्याणकर यांनी विजेते पदाचा तर आनंद कुबडे यांना उपविजेते पदावरती समाधान मानावे लागले.
प्रथम क्रमांक विजेत्या विनायक कल्याणकर यांना रोख रुपये ५००१/- (नागेश पाळेकर व शिवम खटावकर पुरस्कृत) तर द्वितीय क्रमांक विजेता आनंद कुबडे यांना ३००१/- (सचिन बंडू पाटील पुरस्कृत) आणि शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्वप्नील कल्याणकर,आप्पा कल्याणकर,प्रविण वरुणकर,राजू पिसे,आशिष पिसे,संतोष कल्याणकर आणि बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.या स्पर्धेला परिक्षक म्हणून आशिष पिसे,बापू वरुणकर,साई खटावकर यांनी काम पाहिले.संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तळेरे बाजारपेठ मंडळाच्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.