संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शासनाने ई-पीक पाहणी ॲपमध्ये सुधारणा करून ई- पीक पाहणी ॲप व्हर्जन -२ हे नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे हे ॲप शेतकऱ्यांना वापरण्यास सोपे व सुटसुटीत आहे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची ई-पीक पाहणी वेळेत केल्यास शासनाकडून मिळणारे विविध योजनेचा लाभ तसेच नुकसान भरपाई मिळणास मदत होते शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे त्याचा वापर करून आपल्या जमिनीचा पीकपेरा स्वतःच करावा असे मार्गदर्शन शिरगाव मंडळ अधिकारी दीपक पावसकर यांनी शिरगाव येथे केले.
तहसीलदार कार्यालय देवगडच्या वतीने शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शेतकरी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी ई-पीक पाहणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्यावर्षी च्या ई-पीक पाहणी ॲपमध्ये त्रुटी होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना अडचणी येत होत्या तेव्हा शासनाने आता या ॲपमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना सहज समजले अशा सोप्या भाषेत ई-पीक पाहणी व्हर्जन-२ विकसित करण्यात आले आहे. असे मत दिपक पावसकर यांनी व्यक्त केले.
शिरगांव तलाठी स्वेतांजली खरात यांनी व्हर्जन-२ ॲपच्या कार्य प्रणाली व वापराबद्दल प्रात्यक्षिक द्वारे उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी देवगड पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल, शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शिरगाव हायस्कूल चे प्राचार्य शमशुद्दीन अतार, शिरगांव पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, शिरगांव सोसायटी चेअरमन मंगेश लोके, संचालक संतोष तावडे, सचिव वृदेश मेस्त्री, महेश चौकेकर आदी उपस्थित होते.