शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील एकदम टोकाला वसलेला आणि कणकवली तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर भोगलेवाडी फाट्यावरील रस्त्याच्या मधोमध पडलेला भला मोठा चर सध्या वाहनधारकांसाठी फार मोठे अपघाताचे कारण ठरत आहे.
चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी हा मार्ग सुमारे १.८०० कि.मी. आहे. सध्या या रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यंदा या मार्गावरील चाफेड – साळशी या फाट्यापासून श्री कुलस्वामिनी मंदिरापर्यंत फक्त २२० मीटर डांबरीकरण झाले.मात्र उर्वरित पुढील घाडीवाडी पासून ते भोगलेवाडी फाट्यापर्यंत तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी,रिक्षाचालक यांना वाहने चालवताना खूप त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. दुचाकीस्वारांना तर वाहन चालवताना खूपच तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडले देखील आहेत. एस. टि कशीबशी चालू आहे.ऐन गणेश चतुर्थी सणाला जर एस्टी वाहतूक बंद पडली तर ग्रामस्थांचे अतोनात हाल होणार आहेत. दरवर्षी या गावठणमधील ग्रामस्थ स्वखर्चाने अंगमेहनत घेऊन श्रमदान करून खड्डे बुजवितात. मात्र संबधित खात्याला किंव्हा लोकप्रतिनिधींना जरा सुध्दा दयामाया येत नाही.ही वस्तुस्थिती आहे.
रस्त्याच्या मधोमध पडलेल्या चरामुळे आणखीनच धोका वाढला
गावठणवासियांना नळपाणी योजनेसाठी पाईपलाइन टाकण्यासाठी भोगलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध जो चर खणण्यात आला त्यावर ठेकेदाराने व्यवस्थित सिमेंट न लावल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यावरील माती वाहून गेली आणि रस्त्याच्या मधोमध भलामोठा भगदाड पडला.त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा चर दिसत नाही. परिणामी भविष्यात अपघात घडण्याची दाट शक्यता वाहनचालकातून व्यक्त होत आहे.तरी संबधित नळपाणी योजनेच्या ठेकेदाराने हा चर लवकरात लवकर सिमेंट टाकून बुजून टाकावा. जेणेकरून भविष्यात कोणताही अपघात होणार नाही. अशी ग्रामस्थ मागणी करत आहेत.