सिंधुदुर्ग | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह : अखंडाची जाण घ्यायची सगुण ओढ लागत पावलं पंढरीकडे वळतात. माऊली माऊलीचा गजर सुरु होतो. रंजले गांजले आणि छान चांगले असे सगळेच पोटतिडकिने कानड्या राजाच्या दर्शनाला तालबद्ध पावलांनी चालत असतात.
त्यांच्यासोबत वारीत असते अखंडाची अढळता.
ढोल ताशां आणि झांजा चिपळ्यांनी ह्रद्यातील कृतज्ञतेचे संगीत रचत ,छेडत वारकरी चाललेला असतो. रींगण पहायला आलेला आणि वारीचे दर्शन घेऊ पहाणारा व ते वारकरी संगीत ऐकणारा प्रत्येक जण श्रोता व प्रेक्षक रहाता थेट त्या वारीत सामिल होतो.
वारी पुढे चालत आसते. सगुण स्वरुपाच्या कळसाचे दर्शन होते आणि काहीजण मुक्त होतात. काहींना अजून पुढे जाऊन दर्शन घ्यायचे असते म्हणून ते सभामंडपापर्यंतच्या पायर्यांवर जाऊन तृप्त होतात. काहीजण त्यापेक्षाही आत जाऊन गाभार्यात बसतात. ते तुकोबा बनतात. भर गर्दीतही गाभार्यात असते जीवनातील सर्वोच्च समाधानाची शांतता आणि दर्शन घेणार्या भाविकाच्या स्पंदनातून एकच भावना भरभरुन वहात असते ती म्हणजे “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..!”
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..!
ह्या पहिल्या चरणांत सगळी जीवनातली धकाधकी व अस्ताव्यस्ता संपून सगळं चराचर भगवंत दिसावा असा विसाव्याचा गाभारा बनतो.
लतादिदींचे सूर हे आसपासच्या जगाचा विचारही मनाला शिवू देत नाहीत.प्रदूषीत झालेल्या गीत बोल भावांविषयी तक्रार करणं दूरच ते ऐकूसुद्धा येत नाहीत…! प्रत्येक जण माऊली बनून माऊलीचं रुप स्वरुप बनवून न्याहाळू लागतो.
जीवनाची वीट कशी असावी…?तर अशी विठूसारखी असावी. ह्याची कणखरता तुकोबा सांगतात. तटस्थपणे कमरेवर हात ठेवणे हा पहिला गुण निर्गुण जाणीचा. संगिताचाही मोह टळून इथं फक्त तुकोबा व लताजी ऐकू येतात…व हेच ते संगित बनून असतं ह्या माऊली अभंगाची एक वीट जी अविचल असते पण वरचढ नाही.
“तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी!”
ह्या चरणात जाण घेऊ पहाणारा जीवन गीत संगित श्रोता माऊली स्वरुपाचा पोषाख नेटकेपणा स्वतःला लावून घेऊ शकतो. तुळशीचे महात्म्य तिच्या औषधी गुणांसकटचे माऊली रुप ह्या चरणशब्दांत आहे. जगाकडे पहायची दृष्टी स्वच्छ करतो तो तुळशीहार व स्वतःलाही निर्जंतुक ठेवू शकतो तो तुळशीहार..!
फक्त त्याचे महात्म्य व पत्थ्य जपणे हीच तुळशी माळवाल्या वारकर्यांची भक्ती व उपासना.
“मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..!”
इथे खरीखुरी श्रोत्याची व माऊली स्वरुप न्याहाळं पहाणार्या भक्तांची कसोटी आहे. विठ्ठलाच्या माऊली संदेशाशी एकरुप व्हावे लागते. त्या विठ्ठलाच्या हलकेच मागे लपून थोडा शिष्टाचारी अदब जपत त्याच्या नजिक पोहोचून प्रत्यक्ष विठ्ठलाला स्पर्श करायचा मोहही वारकर्यांना होतोच पण दर्शन पर्वणीनेही जे समाधान मिळालेले असते तेही आषाढ भेटीत चिंब करुन जाते.
माऊलींचे कान म्हणजे सामाजिक जीवनात आपण कसे ऐकावे ह्याचीच जाण. मगरीची कुंडले म्हणजे कानातली आभुषणे आहेत. सगळे ऐकावे पण जे जे उचित् ते ते मगरीच्या चपळाई,चलाखी व जबड्याच्या गच्चपणे मनांत धरुन ठेवावे. सोडू नये…सांडू नये. कोणाचे काय ऐकायचे व प्रत्यक्षात श्रवण करायचे हे विनंती बोल आचरण बनले की वारकर्याला ते रुप दिसू लागते.
विठ्ठल कंठिचा कौस्तुभमणी म्हणजे समुद्रमंथनानंतरचे विष्णुंचे दुसरे रत्न इथे स्वरुपाने विठ्ठलाच्या गळ्यात विराजले आहे.
“तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी !”
चौसष्ठ कला व चौदा विद्या. श्रवणभक्तीसाठी कलांचा मार्ग फार परीणामकारक हे तुकोबांनी अभंगातून दाखवून जाण बनवलं. ह्यांतलं काहीही नेमके व नेटकेपणे करता येणे हेच माऊली दर्शन.
श्रीमुख..हरीमुख म्हणतात तेच हे बोल. तीच ही रचना व तोच हा आवाज.
वारकर्याची किंवा माळकर्याची पावलं गाभार्यतून बाहेर पडायला तयार नसतात. माऊलींवरील नजर हटवायला दृष्टी तयार नसते. त्याचवेळी “विठ्ठल म्हणजे प्रपंचातील कष्टांचा देव आणि विठ्ठल म्हणजे श्रमीक व शेतकर्यांचे चैतन्य” असा साक्षात्कार होतो आणि त्याच प्रचितीचा परमार्थ जीवनाची पंढरी बनून आषाढी एकादशीच्या पूजेची आरती ओवाळली जाते ती अगदी धो धो कोसळणार्या पावसातही..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह.