चिंदर | विवेक परब : फाल्गुन वद्य तृतीया (तिथीप्रमाणे) शिवजयंतीच्या औचित्याने मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत रामगड,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम व शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने दिनांक 20 आणि 21 मार्च रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी यांनी रामगडावरील गणेश मंदिर परिसर, सदर आणि इतर परिसरातील झाडी साफ करत परिसर मोकळा केला.
दिनांक 21 मार्च रोजी छ. शिवाजी महाराजांचं पूजन रामगड सरपंच श्री. विलास घाडीगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने दुर्गवीर, दुर्गप्रेमी, शिवप्रेमींसोबत रामगडचे मुख्य खोत मानकरी श्री. अभय प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. फोंडके, बाळा मेस्त्री,बंटी हाटले, नरेश कामतेकर, स्वप्निल घाडीगांवकर, ओंकार गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच श्री. घाडीगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने गेली 7 वर्ष रामगडावर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कामाबद्दल समाधान व्यक्त करत दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या सर्व शिलेदारांचे कौतुक केले. आज दुर्गवीर मुळे पूर्णपणे झाडीझुडपांमध्ये दडलेला हा किल्ला मोकळा श्वास घेतोय तसेच रामगडाच्या संवर्धनासाठी गावच्या स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन श्री.घाडीगांवकर यांनी दिले. श्री. प्रभुदेसाई यांनीही सर्व दुर्गवीरांशी संवाद साधत आगामी संवर्धन कार्यांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित व दुर्गम गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील यशवंतगड, मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी स्थानिक दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. महाराजांच्या कार्याचे, स्वराज्याचे साक्षी असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी शिवप्रेमीनी दुर्गवीर सोबत सहभागी होऊन या शिवकार्यास हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष हसुरकर यांनी केले आहे.