मसुरे | प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या तीस पिल्लांना रविवारी पहाटे त्यांच्या अधिवासात अर्थात समुद्रात सोडण्यात आले. येत्या काहि दीवसात अजूनही काही घरट्यातून बाहेर पडणारी पिल्ले समुद्राकडे सोडण्यात येणार असल्याची माहिती कासवप्रेमी नागरिक अजित रासम यांनी दिली आहे. १७ जानेवारीला सदर अंडी समुद्र किनारी आढळून आल्या नंतर अजित रासम, देविदास बोरकर, नरेंद्र महाजन आदींसह आडवळवाडी ग्रामस्थानी सदर अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी सभोवताली जाळे बांधले होते. तसेच या घरट्या कडे त्यांचे सतत लक्ष होते. १३ मार्च रोजी पहाटे २ वाजता तीस पिल्ले या घरट्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागल्याचे निदर्शनास येताच संरक्षणासाठी उपस्थित असलेल्या सागर मालडकर, राहुल माणगावकर, अजित रासम, किरण रासम आदी कासव मित्रांच्या उपस्थितीत या पिल्लाना समुद्रात सोडण्यात आले.
समुद्र साखळीतील महत्वाचा घटक असलेल्या कासवाच्या अंड्यांचे संरक्षण करत नवीन पाहुण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मुणगे आडवळवाडी ग्रामस्थांचे या निमित्ताने कौतुक होत आहे.
या सागरी जीवांना संरक्षण देत खुल्या समुद्राकडे रवाना करताना मुणगे किनारी उपस्थित प्रत्येकाची भावना होती “जिओ जी भरके…!”