आंगणेवाडी | प्राजक्ता पेडणेकर : प्रती पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव अर्थात आंगणेवाडीची जत्रा गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. कोरोनाचे शासकिय निर्बंध पाळत भाविकाना दर्शन मिळणार असल्याच्या पार्श्वभुमीवर लाखो भाविक आई भराडी मातेच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. यात्रोत्सवा साठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबिय अहोरात्र मेहनत घेत आहेत. नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या भराडी देवीचा यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यात्रे पूर्वीच आंगणेवाडीत व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे. हॉटेल व्यावसाईक, मिठाई व्यापारी आंगणेवाडीत दाखल झाल्याने परिसरात मालवणी खाजाचा घमघमाट पसरला आहे. गतवर्षी कोरोनामुळे यात्रोत्सव मर्यादीत स्वरुपात साजरा झाल्याने यावर्षी भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाविक केंद्र बिंदु ठेवून नियोजन
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारानी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकाना या ठिकाणी येतो. याच भाविकाना केंद्र बिंदु मानुन कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकाना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहीती अध्यक्ष भास्कर आंगणे यानी दिली आहे.
प्रशासनाची सुध्दा लगबग वाढली
आंगणेवाडीत किराणा व्यावसाईक, स्वीट मार्ट आदि व्यापाºयांनी आपली दुकाने थाटण्यास सुरवात केली आहे. भाविकांच्या दर्शन रांगा, लाकडी उड्डाण पुल, विद्युत रोषणाई, मुख्य सभामंडप आदि ठिकाणचे काम अखेरच्या टप्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने यात्रेतील तात्पुरत्या व्यावसाईकाना वीज कनेक्शन देणे, मुख्य ट्रान्सफॉर्मरची अर्थींग चेक करणे आदि कामे जोरदार चालू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने मसुरे, चौके, हिवाळे, आचरा, गोळवण, मालवण येथील कर्मचारी स्वच्छता व पाणीशुध्दीकरण कामासाठी कार्यरत आहेत.
दहा रांगा द्वारे मिळणार देवीचे दर्शन
कमीत कमी वेळेत भाविकाना देवीचे दर्शन एकूण दहा रांगांद्वारे होण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्ष भास्कर आंगणे यानी दिली. भाविकानी तोंडाला मास्क वापरणे तसेच लसीकरणाचे दोन डोस पुर्ण झालेले असणे आवश्यक आहे. ग्रामस्थ मंडळा बरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणे कडून यात्रेकरुंच्या सोई साठी पुरेपुर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांगांच्या मार्गात भाविकांसाठी पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे कडुन मुंबई वरुन येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासर्व जादा गाड्याना सिंधुदुर्गातील सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. सध्या एसटीचा संप चालु असल्याने येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्याना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. एकुणच २४ फेब्रूवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी विविध राजकिय पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या स्वागत कमानीनी आंगणेवाडी सजु लागली असून काही तासानी लाखो भाविकांचे स्वागत करण्याचे भाग्य समस्त आंगणे कुटुंबियाना श्री देवी भराडी मातेच्या यात्रेच्या निमित्ताने मिळणार आहे.