बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ‘शिवतेज सेवा संस्थेच्या’ वतीने आज शनिवार दिनांक १९ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा व संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. याठिकाणी व्यासपीठावर किल्ल्याची प्रतिकृती असून खास शिवप्रेमींसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. यावेळी शिवविचारांवर सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज समन्वयक अँड. सुहास सावंत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आमदार दीपक केसरकर, राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, वेशभूषा, पोवाडा स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ऍड. विठ्ठल परब, कार्यवाह अनुज बांदेकर यांनी केले आहे.