रमाई नदीचा भूभाग पुन्हा खचण्यास सुरवात...!
दोन वर्षे केवळ आश्वासनावर बोळवण..!
भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी वेधले लक्ष..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी तरी नजीक मागील दोन वर्षे रमाई नदीच्या प्रवाहामुळे खचणाऱ्या भु भागात वाढ झाली आहे. येथील साबाजी हडकर यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरती नदीचे पात्र आले असून येथील लगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.याही वर्षी येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. मागील दोन वर्षे केवळ धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे अश्वासनच येथील ग्रामस्थ ऐकत आहेत. रमाई नदीने किनारपट्टी गिळंकृत केली असून हडकर यांच्या घरांचे अंतर हे नदीपासून अवघ्या तीन ते चार फुटांवर राहिले आहे.
या ठिकाणी बंधारा उभारणी व्हावी यासाठी येथील ग्रामस्थांचा गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कावावाडी येथील भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी सर्व संबंधित विभागाचे संबंधित लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
काही दिवसापूर्वी पतन विभागाच्या अधिकारी वर्गाने या ठिकाणी पाहणी सुद्धा केली होती. फक्त सर्वजण येथील बंधारा लवकरच सुरू होणार असे तोंडी आश्वासन देतात बाकी कार्यवाही शून्य. याबाबत येथील पंढरीनाथ मसुरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी उशिरा मालवण पोलीस दूरक्षेत्र चे पोलीस निरीक्षक विजय यादव आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले असून केव्हाही मदत लागल्यास लगेच दूरध्वनी करण्यास सांगितले.
शासन प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ योग्य त्या उपयोजना कराव्यात. तसेच याठिकाणी बंधारा मंजूर करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)