“तिने कसलाच बाऊ केला नाही..!” (लेखिका | अनुराधा दीक्षित,वाडा,देवगड,जि.सिंधुदुर्ग.)
‘लता’ हे किती सामान्य नांव आहे ना….?
पण ‘लता’ म्हणले की एकच चेहरा, एकच नांव,एकच व्यक्ती नजरेसमोर येते ती म्हणजे अर्थातच ‘लता मंगेशकर..!’ तिच्यावर किती आणि कधीही लिहीले तरी कमीच! पण आता तर लिहीलेच पाहिजे ! उशीर झाला असला तरीही लिहीलेच पाहिजे.
कुणी तिला ‘लतादीदी’ म्हणतात,’लताबाई’ म्हणतात, ‘लताजी’ म्हणतात पण त्यात केवढातरी आदर,अभिमान, प्रेम अशा अनेकविध भावनांचा कल्लोळ असतो.इतकी वर्षे ही व्यक्ती देहानेही आपल्यात होती,तेव्हा तर ती आपल्यासाठी भारतरत्न होती,महाराष्ट्र भूषण होती,पण ते स्वाभाविकच होतं.कारण ती आपल्या देशात, आपल्या राज्यात रहात होती! तिच्या जिवावर आपण किती भाव खात होतो! पण ती फक्त एवढीच सीमित होती का? तर नक्कीच नाही.
देशाच्या सीमा ओलांडून ती सा-या जगाचीच झाली होती! शेजारी पाकिस्तान सारखा देशही म्हणत असे की,’तुमची लता आम्हांला द्या ,आम्ही तुम्हांला काश्मीर देतो…!’ शत्रूलाही हेवा वाटावा असा अनमोल ठेवा आपल्याकडे होता.आता तर भौतिक जगाच्या सा-या सीमा ओलांडून हा ईश्वरी ठेवा प्रत्यक्ष ईश्वराकडेच परतलाय..!
‘लता’ उलट वाचले तरी ती आपला ‘ताल’ सोडत नाही! आयुष्यभर हा ताल आणि वागण्यातला तोल तिने सांभाळला! तिला कुणीतरी विचारलं होतं की, “तुम्हाला परत जन्म घ्यावासा वाटला,तर लता मंगेशकरच व्हायला आवडेल का?” अशा वेळी आपण म्हणालो असतो, “मग काय,लता मंगेशकरच व्हायला आवडणार ना!” असा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर तिला मिळालेली प्रसिद्धी, कीर्ती,मानमरातब, पैसा,आदर सारे काही आले असते.त्यामुळे आपण तसाच विचार करतो!पण तिने जे उत्तर दिलं ते अनपेक्षित होतं! लताजी म्हणाल्या, “छे,छे! मला परत लता मंगेशकर मुळीच व्हायचं नाहिये! ह्या जन्मात मला ज्या ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागलंय, ते मला परत भोगायचं नाहिये! लता मंगेशकर होणं मुळीच सोपं नाही…!” हे उत्तर ऐकून तिचे ऐकलेले,वाचलेले आयुष्य डोळ्यांसमोर उभे राहते आणि तिने दिलेले उत्तर आपल्याला पटू लागतं! वयाच्या तेराव्या वर्षी पितृछत्र हरपलेले,त्यातच आई आणि पाठची चार लहान भावंडे ह्या सा-यांची जबाबदारी त्या कोवळ्या तेरा वर्षाच्या मुलीच्या खांद्यावर येऊन पडली! त्याचक्षणी ती अकाली मोठी झाली. तिच्याकडे शिक्षण नव्हते…होता तो फक्त गाता गळा…! ज्याच्यावर तिच्या वडिलांनी… दीनानाथ मंगेशकरांनी गाण्याचे संस्कार केले होते! तेवढ्याच भांडवलावर तिने लांब लांब चालत जाऊन गाण्याच्या स्टुडिओंचे उंबरठे झिजवायला सुरूवात केली.ह्या पडत्या काळात तिच्या कुटुंबाला मदत केली, ती मास्टर विनायक यांनी! त्यांनी संपूर्ण मंगेशकर कुटुंब कोल्हापुरला आणले.तिला आपल्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम दिले. तिला अभिनयाची आवड नव्हती,तरी पैशांसाठी ती छोटी छोटी कामे करीत राहिली. एकीकडे गाणीही थोडीफार मिळत होती.ती स्वतःच्या इच्छा मारून कुटुंबासाठी जगत होती.तिच्यासाठी कुणी काही करणारे नव्हते.पण तिने कशाचीच कोणाकडूनही अपेक्षा केली नाही. त्या कोवळ्या वयात तीच आपल्या भावंडांची आई-बाप सारं काही झाली! कालांतराने ‘लता’ हे छोटंसं नाव प्रचंड मोठे झाले! तरिही तिने आपल्या कुटुंबाचाच विचार प्रथम केला! तिच्या आयुष्यात येऊ पहाणाऱ्या आवडत्या व्यक्तींनाही दोन हात दूरच ठेवलं.आपल्या तत्त्वांसाठी भांडली,घरातल्या प्रत्येकासाठी झिजली,कोणाच्या असूयेचाही विषय झाली, पण आपल्या माणसांवर मात्र कायमच मायेची पाखर धरून राहिली, भावंडांची काळजी घेतली,त्यांना शिकवून सवरून मोठं केलं.’आशा’ ने आपला वेगळा विचार केला, तेव्हा मोठ्या बहिणीच्या हक्काने तिच्यावर रागावली,अबोला धरला.पण तिच्या कठीण काळात तिला भक्कम आधारही दिला. ह्या सगळ्यात तिने केलेला त्याग,तिचं अविवाहित राहणं हे अपरिहार्यपणे तिने स्वीकारले.त्याचा कधी बाऊ केला नाही की, नाराजी दाखवली नाही! कधीतरी लताबाईंच्या रागाचे,विक्षिप्तपणाचे किस्सेही कधी कधी ऐकायला मिळाले. पण एक खरे की त्यांनी कधीही कायमची म्हणावी अशी अढी कुणाबद्दलही मनात बाळगली नाही की, कोणाचे जीवन उद्ध्वस्त केले नाही. पाकिस्तानसारख्या देशातही तिला अगदी शानदार आदराची श्रद्धांजली वहिली गेली.तिच्या आठवणी जागवल्या गेल्या.नूरजहाँ आणि लताची बाघा बाॅर्डरवर झालेली भेट,एकमेकींच्या गळ्यात पडून रडणे,मेहदी हसन,गुलाम अली इ.बद्दल लताच्या मनात असलेला आदरभाव, नूरजहाँकडून लताने शिकलेले उर्दु शब्दांचे उच्चार यांवर अगदी भरभरून बोललं गेलं,प्रत्येक पाकिस्तानी लताच्या प्रत्येक गाण्याचा किती चाहता आहे हे आवर्जून सांगितलं गेलं….तेव्हा कळलं की,’लता’ ह्या छोट्याशा नावाला देश,स्थळकाळाच्या मर्यादा नाहीत. तिने तर सारे जग काबीज केलेय! ‘चराचर व्यापूनी दशांगुळे’ उरलेला हा आवाज अजून कित्येक पिढ्यांना पुरून उरेल! हे इवलंसं लावलेलं मोग-याचं रोप गगनावेरी स्वर गात जाऊन तिथेही आपला मोहक सुगंध नक्कीच दरवळवत असेल नाही का? स्वरमयी,सूरमयी, अमृतमयी लताला कोटी कोटी प्रणाम!
तुम्हारी याॅद हमेशा आएगी..!
लेखन : अनुराधा दीक्षित. वाडा,देवगड.