शिरगांव | संतोष साळसकर : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रख्यात असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा १ व २ मार्च ला होणार आहे.याबाबतची नियोजन बैठक लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.अनेक विकासकामे जी अपुऱ्या अवस्थेत आहेत ती पूर्णत्वाकडे जाणे गरजेचे आहे.अशी माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी कुणकेश्वर येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या यात्रोत्सवाचे नियोजन देवस्थान ट्रस्ट मार्फत सुरू असून ही यात्रा १ व २ मार्चला होणार आहे. धार्मिक विधी व तीर्थस्नानासाठी, देवभेटीसाठी व दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टमार्फत नियोजन सुरू आहे.भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन-प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून नियोजन होणार आहे. अशी त्यांनी माहिती दिली.तसेच यात्रोत्सवकाळात आरोग्य व्यवस्था,पोलीस बंदोबस्त,सुरक्षा व्यवस्था,विधुत व्यवस्था,पार्किंग व्यवस्था,वाहतूक आणि परिवहन व्यवस्था तसेच येण्या-जाण्याचा मार्ग याबाबत नियोजन बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.तसेच अपूर्ण विकासकामांकडेही त्यांनी लक्ष वेधले.