संपादकीय विशेष.
मालवण | संपादकीय विशेष : “ती बहिण आहे,ती आई आहे,ती वेल आहे,ती देवी आहे…!” स्त्रीचे वर्णन करणार्या या व अशा अनेक आस्था आणि आदरयुक्त ओळी सामाजिक स्तरावर आपण ऐकतो. आता त्याहीपुढे जाऊन आगामी काळात स्त्री कशी ‘फैसलाधारी’ बनतेय याची प्रचिती सध्या ओमान देशातील ‘अमिरात क्रिकेट मैदानावर’ येतेय.
या मैदानावर दिनांक बाव्वीस जानेवारीपासून निवृत्त क्रिकेटपटुंची ‘ लिंजडस् क्रिकेट साखळी’ स्पर्धा खेळविली जात आहे. यातील सत्तर टक्के खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर निवृत्त जरी असले तरी ते अजूनही क्लब क्रिकेट किंवा स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असणारे आहेत. काही खेळाडू तर अगदी दोनच महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. उरलेले तीस टक्के खेळाडू लिजंडस् हे त्यांच्या त्यांच्या काळातील एक पर्व मानले जातात आणि आजचे क्रिकेटप्रशिक्षक,समालोचक,आलोचक किंवा क्रिकेटतज्ञही मानले जातात…! थोडक्यात या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या अनुभव व ज्ञानाच्या ‘लोण्याच्या बरण्याच ‘ मैदानावर खेळतायत असाच अर्थ लावता येतो.
या लिजंडस्चा दांडगा क्रिकेट अनुभव,यांचे स्टारडम आणि यांचा इतकी वर्ष खेळल्याने आपसुक निर्माण होणारा एक अदृश्य इगो जपणे ही आयोजकांसाठीही एक सर्कसच असते. वाढत्या वयाने काही खेळाडू हे विविध आजारांनीही त्रस्त असतात. मग अशावेळी मैदानावर हमरी तुमरीच्या घटनाही पूर्वी काही लिजंडस् लीगमध्ये घडल्याची उदाहरणे क्रिकेटप्रेमी जाणतातच.
या अशा तुंबळ तज्ञ वातावरणात प्रत्यक्ष मैदानावर पंचगिरी करणे हेही एक दिव्यच असते…!
ओमानमधील या लिजंडस् स्पर्धेत यावर एक जालिम उपाय शोधला गेला व तो अतिशय तंत्रशुद्ध जालिम ठरल्याचेही आता सिद्ध होत आहे.
या स्पर्धेमध्ये पंचगिरी करण्यासाठी पाच अधिकृत पंचांची निवड करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे हे पाचही पंच विविध देशांच्या महिला पंच आहेत.
रिनी माॅन्टेगरी,हुमैरा फऱाह,लाॅरेन एजनबग,शॅन्ड्रे फ्रिटझ् आणि भारताची सर्वात युवा महिला पंच शुभदा गायकवाड भोसले…!
इथे हे लक्षात घ्याव की हाॅन्गकाॅन्ग,दक्षिण आफ्रिका,भारत आणि सोबत पाकिस्तानच्याही महिला पंच या स्पर्धेमध्ये पंचगिरी करत आहेत.
स्पर्धा चुरशीची आहे आणि त्वेषाची सुद्धा आहे तरिही आत्तापर्यंत मैदानावरील निर्णयांमध्ये या महिला पंचांनी सत्त्याण्णव टक्के अचूक निर्णय देऊन इतर आंतरराष्ट्रीय पंचांना आव्हान उभे केले आहे. अचूक निर्णयांची ही सरासरी खूप मोठी आहे.
यातील मैदानावरील पंच पॅनेलमध्ये जे भारतीय नांव आहे ते विशेषकरुन सर्वांच्याच आदराचा विषय बनले आहे.
शुभदा गायकवाड भोसले.
मूळ मध्य प्रदेशच्या शुभदा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी क्रिकेटची आहे. वडिल खेळाडू व प्रशिक्षक आणि काका श्रीकांत गायकवाड माजी रणजीपटू..! त्यांचा भाऊही विदर्भाकडून रणजी क्रिकेट खेळलेला आहे.
शुभदा यांनीही मध्य प्रदेशच्या सोळा वर्षांखालील क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला आहेच परंतु ज्यावेळी वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी प्रथम स्तरावरची पंचगिरीची परीक्षा दिली व त्यात त्यांना यश मिळाले त्यावेळी त्यांनी पूर्णवेळ पंचाची कारकिर्द करायचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी शारिरीक शिक्षणाची पदवीही प्राप्त केली. खरेतर या पदवीची पंच बनण्यासाठी तांत्रिक आवश्यकता नाही आहे परंतु रणरणत्या उन्हात मैदानावर सर्वात जास्त काळ उभे रहायची तंदुरुस्ती वाढविण्यासाठी व स्वतःचा एक पात्रता मापदंड सोबत असण्यासाठी त्यांनी शारिरीक शिक्षण विषयांत पदवी मिळवली,पि.एच.डी.करुन डाॅक्टरेटही प्राप्त केली हे अधोरेखीत करण्याजोगेच आहे..! संपूर्ण वेळ व्यावसायिक पंच बनणे हे नुसते स्वप्न नसून त्यासाठी प्रचंड गृहपाठ,सराव,नियमितता,शारिरीक व मानसिक तंदुरुस्ती,उत्तम दृष्टी आणि तत्काळ व अचूक निःष्पक्ष निर्णयक्षमता हे घटक किती महत्वाचे आहेत याची जाणीव पंच शुभदा गायकवाड भोसले यांना अतिशय युवा वयात झाली हे विशेष .
आधी सर्वात युवा पंच अशी ख्याती आणि नंतर नियमीत अचूक निर्णय यामुळे त्या अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील एक वरिष्ठ पंच म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. विवाहानंतरही त्यांनी पंच कारकिर्दीलाच प्राधान्य दिले आणि यासाठी त्यांच्या पतीने स्वतःला शुभदा यांना अनुकूल वातावरण व पाठिंबा दिला…पाठिंबा म्हणण्यापेक्षा अतिशय प्रसन्नपणे त्यांनी शुभदा यांच्या निर्णयाचा स्विकार सन्मान केला म्हणणे उचित् होईल.
ओमानच्या अमिरात क्रिकेट मैदानावर आगामी काळातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एक झलकच पहायला मिळत आहे.
सर्व वरिष्ठ खेळाडू हे पंचांपेक्षा वयाने मोठे आहेत….काही खेळाडू तर पंचांपेक्षा दुप्पट वयाचे आहेत. या मध्ये शोएब अख्तर,तिलकरत्ने दिलशान,ॲन्ड्र्यू ट्राॅट,केव्हिन पिटरसन वगैरेंसारखी काही अनुभवी,महायशस्वी पण आगाऊ मंडळीदेखील आहेत. या सर्वांचे ‘फैसले’ देणे ही खरेच एक कौतुकास्पद गोष्टच म्हणावी लागेल.
मैदानावर काहीवेळा पुरुष खेळाडूंकडून सहज निघणारे अपशब्द तथा उद्गारही या स्पर्धेत पहायला मिळत नाही आहेत. खेळाडुंना एखादा निर्णय पटला नाही तर पंचांना विचारणा होताना जरुर दिसतेय पण कोणी पंचांशी हुज्जत घालताना दिसत नाही.याचा परिणाम म्हणजे आता आपसुकच ‘पंच किंवा अंपायर’ या पदाची प्रतिष्ठा जपायची शिकवण युवा खेळाडुंना मिळू लागलीय. हा गेम जंटलमन्स न रहाता ‘जंटल ह्यूमन्स’ म्हणून जपणे आवश्यक होते त्याची मैदानावरील सुरवात नक्कीच झाली आहे असे म्हणता येईल.
महिला क्रिकेटर ,महिला मॅनेजर,महिला फिजिओ हे क्रिकेटला नविन नाही परंतु सामन्याचा सर्वात जास्त वेळ मैदानावर पंचच काम करत असतात…तेही अखंड जबाबदारीने म्हणून महिला पंच मैदानावर पंचगिरी करताना पाहणे ही सर्वच क्षेत्रांसाठी हुरुपाची गोष्ट आहे.
शुभदा गायकवाड भोसले नावासारखी इतर अनेक महिलांची नांवे आता आय.सि.सी.च्या मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून दिसली तर नवल वाटू नये कारण महिला पंच हा आता नुसता ट्रेंड राहिलेला नसून तो क्रिकेट जगण्याचा क्रमप्राप्त ब्लेंड बनला आहे.
ती देव्हार्यातून बाहेर मैदानावर आली आहे….’फैसले सुनवायला…..तुमच्या…आमच्या क्रिकेटचे…!’
ती आलीय….फैसलाधारी बनून…!
सुयोग पंडित (मुख्य संपादक)