शेतकऱ्यांची तारांबळ तर आंबा-काजू पीक धोक्यात येण्याची शक्यता
बांदा |राकेश परब : कडाक्याची थंडी सुरू असताना ऐन हिवाळ्यात सोमवारी संध्याकाळी मडुरा पंचक्रोशीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाकडे सरकारने फिरवलेली पाठ आणि आज आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र हतबल झाला. तर आंबा व काजू बागायतदारांसमोर चिंतेचा डोंगर उभा राहिल्याचे दिसून आले.सोमवारी संध्याकाळी अचानक मडुरा पंचकोशीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. भात मळणी सुरू असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. भातासह गुरांना लागणारे गवत वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यापूर्वीच महापूर, अवकाळी पाऊस यासारख्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी भात कापणी केली. परंतु अवकाळी पाऊस मात्र शेतकऱ्यांची पाठ सोडेना. भरपाईसाठी सरकारचे उंबरठे झिजवावे लागणार त्यापेक्षा आम्हीच एकमेकांना सहकार्य करू असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. मळलेले भात वाचविण्यात शेतकरी यशस्वी झाला परंतु गवतात मात्र पाणी शिरले. अगोदरच पावसात भात कुजल्यामुळे गवताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यात आज आलेल्या पावसामुळे गवताची पुन्हा नासधूस होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत मडुरा पंचक्रोशीसह बांद्यात पावसाचा शिडकाव सुरूच होता.