(संपूर्ण काल्पनिक) : भाग दुसरा.
लेखक: सुयोग पंडित.
साल 2004 च्या गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक चोव्वीस वर्षीय सिनेअभिनेत्री अगदी संपूर्ण जगातील चर्चेचा विषय ठरत होती. तिच्यासोबत तिचे पंचाहत्तर वर्षांचे वडिलही एक लेखक म्हणून जगातील इतर चित्रपट महोत्सवातून सर्वत्र पोहोचू लागले होते.
वडिल व मुलीची एक अनोखी कलेची भागिदारी हा सर्व सिनेमारसिक, समिक्षक आणि सिनेमालेखक या सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता.
खरेतर 2004 चा हा गोव्यातील महोत्सव ऐनवेळी त्रिवेंद्रममधून गोव्यात हलवावा लागलेला होता आणि त्यामुळेच भारतीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने त्याचे थेट प्रक्षेपण, चित्रण या सर्वांवर तांत्रिक कारणास्तव बंदी आणलेली होती. फक्त आयोजकांना एक कॅमेरा लावून अगदी खाजगी स्वरुपाचे चित्रण करु शकायची संधी मिळालेली होती.
या सर्व कारणास्तव अनेक सिनेमारसिक, लघुपट तंत्रज्ञ, लघुपट निर्माते आणि चित्रपट महोत्सवातील सर्व इच्छुकांना गोव्यात येण्याशिवाय पर्याय नव्हता पण तेवढ्या जणांची सोय गोवा सरकारही इतक्या कमी वेळात करु शकणार नव्हते…!
पण ज्यांना त्या बाप मुलीच्या जोडीचे आकर्षण होते ते सगळेच गोव्याकडे परवानगी काढून रवाना झालेले होते.
त्या बापमुलीचा हा चौथा चित्रपट होता …पण पहिले तीन चित्रपट त्यांची दखल घेण्याइतपत प्रसारमाध्यमांपर्यंत ते पोहोचले नव्हते.
त्या एक तासाच्या चित्रपटाचे नांव होते ,” काकल्या..!”
आणि त्या लेखकाचे नांव होते श्री.सुनिल सरमळकर…आणि त्यातिल मुख्य नायिका होती कुमारी निर्मिती सुनिल सरमळकर….!
सुनिल सरमळकर हा लेखक पद्यात्मक लेखन करुन चित्रपट लिहीणारा असा प्रसिद्ध झाला आणि त्याची मुलगी निर्मिती अतिशय देखणी,चतुरस्र व भविष्यातील एक संपूर्ण व्यावसायिक अभिनेत्री बनायच्या पैजाही लागू लागल्या होत्या.
“काकल्या…” हा चित्रपट तिथे पहिल्याच दिवशी व पहिलाच उद्घाटनाचा होता आणि त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.विजय परब यांच्या हस्ते ठरले होते.
कार्यक्रमाच्या आखणीनुसार उद्घाटन सोहळा जेमतेम तासभराचा होता आणि नंतर पहिला चित्रपट “काकल्या” दाखवून इतर चित्रपटांची तीन विविध ठिकाणी पहाण्याची सोय केलेली होती.
इतर तीन सिनेमांविषयी फारश्या चर्चा नव्हत्या पण काकल्या आणि त्या बाप मुलीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती…!
श्री.विजय परब अतिशय व्यस्त असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एकाच सिनेमाचा नीट अनुभव घेता यावा म्हणून सुरक्षारक्षक व पोलिस दलाने अतिशय मोक्याची जागा निवडलेली होती.
उद्घाटन झाले….”काकल्या ” चित्रपट सुरु झाला.
या सिनेमाचे वैशिष्ट्य हे होते की त्याची कथा थेट सुरु होत होती आणि नंतर शेवटी श्रेयनामावली दिसणार होती…!
“व्हाॅट द हेल…व्हेअर इज दॅट रायटर ऑफ धिस स्क्रीप्ट?”….अशा अतिशय भडकलेल्या आवाजातील विजय परबांना पाहून अख्खा महोत्सव जागेवर थबकला..!
विजय परब यांच्या पत्नीसुद्धा हमसून हमसून रडत सोफ्यावरुन जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या विशीतल्या मुलाला म्हणजे चिन्मय परबलाही हा काही प्रकारच कळत नव्हता…तो फक्त आईला,” माॅम प्लीज गेट अप…डोन्ट क्राय..”,म्हणत उठवू पहात होता.
सुरक्षारक्षकांचे तीन घेरे आता बाकी व्हि.व्हि.आय.पी. लोकांनाही हटवून तिहेरी वर्तुळात जमा झाले होते.
आयोजकांचे अध्यक्ष तालक देसाई घाबरेघुबरे होत विजय परबांसमोर येत विचारत होते,” काय झाले सर..? काय चुक झाली आमची…किंवा चित्रपटाची…? संपूर्ण सेन्सॉरशिप तपासून मगच सर्व चित्रपट मंजूर केलेयत सर….रिअली यू कॅन चेक सर..!”
आता रागाने लालबुंद झालेले आणि आधीच पिळदार मिशा असणारे राज्यपाल विजय परब तालक देसाईंकडे पाहून म्हणाले, ” दोन मिनिटांत तो हरामखोर लेखक आणि ती ‘माझी’ मुलगी समोर आणली नाहीत ना तर हा अख्खा महोत्सव तिसर्या मिनिटाला रद्द होईल…ब्रिंग देम फास्ट.. यू स्टुपीड …रन…!”
ऑलिंपिकच्या शर्यतीपेक्षा जास्त वेगाने धावत तालकने मुख्य स्टेजजवळील वाॅकीटाॅकी हातात घेत सूचना दिली,” सुनिल सरमळकर आणि निर्मिती सरमळकर यांना वीस सेकंदात इकडे आणा…गव्हर्नरसमोर…क्विक..!”
चाललेला प्रकार कोणालाच कळत नव्हता पण तितक्यात तालकला विजय परबांचे दोन शब्द आठवले. ,”माझी मुलगी…!”
“ओह्ह माय गाॅड…!” म्हणत तालक पुन्हा धावत व हात जोडत विजय परबांसमोर उभा होता.. !
पुढच्या तिसाव्या सेकंदाला वृद्ध व थरथरत्या देहाचे लेखक सुनिल व त्यांची सुंदर गुणी अभिनेत्री कन्या निर्मिती यांना त्यांच्यासमोर आणले गेले.
विजय परबांच्या पत्नीने उभे राहत त्या अभिनेत्रीला,” माझी बेटी… शोना” म्हणत घट्ट मिठी मारली होती आणि विजय परबांनी एका सुरक्षारक्षकाची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन ती लेखक सुनिल सरमळकरवर ताणलेली होती. त्यांचा मुलगा चिन्मय, ” डॅड …आर यू फूल?” म्हणत ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊ पहात होता.
संपूर्ण महोत्सवात तणाव होता…एक चित्रणाचा कॅमेरा चालू होता पण बाकी फोटोग्राफर्सना बंदी नव्हतीच..!
“काकल्या चित्रपटात नेमके काय झालेय?” याची कोणालाच टोटल मात्र लागत नव्हती.
अतिशय संतापजनक स्वरात विजय परब सुनिल सरमळकरच्या कपाळाला बंदूक लावून विचारत होते, ” अरे …..का केलंस रे असं..?का?”
आपल्या बापावर रोखलेली बंदूक पाहून निर्मिती प्रचंड घाबरली होती पण तरिही तिने विचारले,” मिस्टर गव्हर्नर…माझ्या काकांनी म्हणजे माझ्या काकल्याने काय चुकवले आहे तुमचे? आणि या आंटी मला बेटी..शोना का म्हणतायत ते आधी सांगा…कलाकारांना काही सन्मान आहे की नाही..?
तिचा करारी पण मधुर आवाज ऐकताच विजय परबांच्या हातची बंदूक गळून पडली…आता ते ही जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले.
अभिनेत्री निर्मितीकडे पाहून हात जोडत ते म्हणत होते ,”या हरामखोर माणसालाच विचार…या निर्दयी पशूलाच विचार…या नालायकालाच विचार…नाहीतर या भिकार्यालाच विचार गं बाळा..माझ्या शोना..विचार.
माझी चूक होती की मी तुला आमचे व्याप वाढल्यानंतर याच्या हवाली केलेला…सख्ख्या भावासारखा. तुझ्या काकासारखा…..तुझ्या काकल्यासारखा…मी गुन्हेगार आहे तुझा व या तुला घट्ट पकडून बसलीय त्या तुझ्या आईचा !…माफीही कशी मागू बेटी..कशी मागू?”
गोव्याच्या गव्हर्नर बंगल्यातील दिवाणखान्यात विजय परब, अवंती परब, अभिनेत्री निर्मिती सरमळकर आणि चिन्मय सरमळकर एका सोफ्यावर होते आणि पायाशी बसून लेखक सुनिल सरमळकर सांगत होते ,” शांतपणे ऐक आणि विश्वास ठेव विजू..होय विजूच म्हणतोय.
पुराव्यानिशी सर्व सांगून, दाखवून नाही पटले तर तुझ्या सुरक्षारक्षकांच्या बंदुका घे आणि माझे अख्खे शरीर चाळणी करुन टाक..वचन देतोय मी व तशी शपथही देतोय!”
पित्याला असे बोलताना हबकलेली अभिनेत्री निर्मिती,थोडे शांत झालेले महाराष्ट्र राज्यपाल विजय परब , अभिनेत्री निर्मितीला कवटाळून घेत घेत गोंजारत असलेली राज्यपालांची पत्नी आणि ” च्यायला काय चाललंय!” असे आता अस्खलित मराठीत बोलणारा राज्यपाल विजय परबांचा मुलगा चिन्मय विस्मयाने व एका अनामिक व्याकुळपणे जमिनीवर बसलेल्या थरथरत्या वृद्ध आंतरराष्ट्रीय लेखकाच्या बोलण्याकडे कान ,डोळे व मेंदू लावून पहात बसलेले एक अकल्पित चित्र तिथले मुख्य संरक्षक पाहत होते…!
(क्रमशः)
(कथेचा पुढील व अंतिम भाग उद्या दिनांक 09 जानेवारी…. फक्त आपल्या आपली सिंधुनगरी चॅनेलच्या पोर्टलवर)