अध्यक्ष महेश इंगळे यांची माहीती
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : संपूर्ण राज्यात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरीएंट आपला संसर्ग वेगाने वाढवण्याचे लक्षण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मंदिरात सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत समारंभाचे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आले असल्याची माहीती मंदिर समिती अध्यक्ष महेश इंगळे यानी दिली आहे. धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी नाताळ सुट्या, नूतन वर्षाच्या कालावधीत भाविकाना मंदिरात स्वामींचे दर्शन घेता येणार आहे.
ओमीक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नाताळच्या सुट्या व नूतन वर्षाचा कालावधी चालु झाला आहे. कोरोना संसर्ग पुन्हा वाढु लागल्याने नुतुन वर्षाच्या प्रारंभी मंदिरात आयोजीत धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची सुचना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे कोल्हापुर, पुणे, मुंबई येथील भजनी मंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर व नूतन वर्षाच्या मुहूर्तावर भजन, सोंगी, भारुड, इत्यादी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याचे अध्यक्ष महेश इंगळे यानी सांगीतले.