बांदा / राकेश परब : बांदा शहरात फिरताना आढळलेल्या मनोरुग्ण महिलेला बांदा ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने पणदूर येथील सविता आश्रम मध्ये दाखल केले.
सदरची महिला ही बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात काल रात्री उशिरा फिरताना आढळली होती. येथील ग्रामस्थ हेमंत दाभोलकर व मिलिंद सावंत, सुनील नाटेकर यांनी या महिलेची विचारपूस केली. त्यानंतर तिला कपडे व खाण्याचे पदार्थ दिलेत. याची कल्पना बांदा पोलिसांना देण्यात आली. पोलीस विजय जाधव, ज्योती हरमलकर यांनी याठिकाणी धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी जीवन आनंद संस्था संचलित पणदूर सविता आश्रमचे प्रमुख संदीप परब, महाबळेश्वर कामत, भक्ती परब, ज्योती आंगणे, प्रतीक्षा सावंत, रतन सावंत यांनी बांद्यात येत महिलेला ताब्यात घेतले. महिलेची रवानगी आश्रमात करण्यात आली. ही महिला गोव्याची भाषा बोलत असून यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास सविता आश्रम येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.